सावंतवाडी (प्रतिनिधी)
मुसळधार पावसामुळे शेतविहीर कोसळली ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान ; नेमळे येथील घटना
सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावडे वाडी येथे मुसळधार पावसामुळे एका शेतकऱ्याची शेतविहीर कोसळली. दत्ताराम (तातो) राघोबा मालवणकर यांच्या मालकीची ही दगडी बांधकाम असलेली विहीर सुमारे दहा वर्षांपूर्वी बँकेकडून कर्ज घेऊन बांधण्यात आली होती. या विहिरीच्या पाण्यावर मालवणकर यांचा माड, आंबा आणि इतर शेती अवलंबून होती. तसेच, उन्हाळ्यात परिसरातील कुटुंबे देखील या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करत होती.
सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ही विहीर कठड्यासह पूर्णपणे कोसळली आहे. यामुळे शेतकरी दत्ताराम मालवणकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती नेमळे ग्रामपंचायतीला दिली असून, अतिवृष्टीमुळे कोसळलेली विहीर पुन्हा बांधून देण्याची मागणी केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच नेमळे ग्रामसेवक चौहान, तलाठी पोळ, सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ आणि लिपिक राजा गवस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि नुकसानीचा पंचनामा केला.
