बांदा (प्रतिनिधी)
पाडलोसमध्ये बीएसएनएल सेवा विस्कळीत ; नेटवर्क समस्येमुळे ग्राहकांत रोष समस्या सोडविण्याची मागणी
पाडलोसमध्ये गेले पंधरा दिवस बीएसएनएल सेवा विस्कळीत आहे. ग्राहकांना नेटवर्क समस्येमुळे अनेक अचडणी येत आहेत. विशेषतः नेटवर्क कव्हरेज, कमकुवत सिग्नल, आवाज अस्पष्ट येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएल अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देत सेवा सुरळीत करण्याची मागणी पाडलोसमधील सामाजिक कार्यकर्ते दादा सातार्डेकर यांनी केली आहे.
इंटरनेट आणि मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी हे आजकाल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु पाडलोसमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत खंडित होणाऱ्या बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेमुळे वर्क फॉर्म होम करणाऱ्यांना कामात व्यत्यय येत आहे. तसेच आवश्यकवेळी फोन करणे सुद्धा कठीण होत आहे. त्यामुळे रिचार्ज करून सर्व खर्च वाया जात असल्याचे सातार्डेकर यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीवेळी फोन करावयाचा झाल्यास आम्हाला मडुरा किंवा घरापासून दूरवर जावे लागते. त्यामुळे जवळपास असलेल्या टॉवरची नेटवर्क क्षमता वाढविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा सातार्डेकर यांनी केली आहे.

