कणकवली तालुक्यात गेल्या सहा दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यात 79,000 हजार रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी सकाळी झालेल्या पावसामुळे जानवली येथील अनिता अनिल कदम यांच्या घरावर फणसाच्या झाडाची फांदी पडून 64 हजार रुपयांचे नुकसान झाले. खारेपाटण येथील रामाकांत राऊत यांच्या संरक्षक भिंत पडल्याने 2500 रुपयांचे नुकसान झाले. भिरंवडे-गांधीनगर येथील मांगर कोसळून 4000 रुपयांचे नुकसान झाले. करूळ येथील घनःश्याम जाधव यांचे घराचे नुकसान झाले. बिडवाडी येथील विनायक सावंत यांच्या घराचे 8000 रुपयांचे नुकसान झाले आहे, असे एकूण मिळून 78 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यासह कणकवली तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात मंगळवार सकाळी 8 वाजेपर्यंत 128 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.