देवगड (प्रतिनिधी)
देवगडात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतजमिनी बागायती पाण्याखाली ; वाहतुकीचा वेग मंदावला ; पवनचक्की येथे वादळी वाऱ्याचा फटका
रेंबवली येथे झाड कोसळून घराचे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी नाही ; वीज पुरवठा खंडित
देवगड तालुक्यात सोमवारी मध्यरात्री एक वाजलेपर्यंत पासून मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे तालुक्यात ठिकठिकाणी झाडांची पडझड आली आहे.त्याच बरोबर सौरपथदीप ही पडले आहेत.वीज यंत्रणेत सातत्याने बिघाड होत असल्याने विद्युत पुरवठा ग्रामीण भागात खंडित झाला होता.तर शहरी भागात देखील खंडित झालेल्या विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होती. या मुसळधार झालेल्या वादळी वाऱ्यामुळे देवगड पवनचक्की या ठिकाणी असलेल्या स्टॉलवरील दुकानाची छप्पर देखील उडून गेले.सकल भागातील रस्ते,माड बागायती या ठिकाणी पाणी भरले होते तर नदी नाले ही दुथडी भरून वाहत होते.काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक देखील काही काळ बंद झाली होती. रेंबवली येथे वळंजू यांच्या घरावर शेवग्याचे झाड पडून सुमारे १० हजार रुपये नुकसान झाले आहे. मंगळवारी १८० मिमी इतका पाऊस झाला,तालुक्यात आतापर्यंत एकूण पाऊस ५८८ मिलिमीटर इतका झाला आहे. मे महिन्याच्या पर्यटन हंगामातच कोसळणाऱ्या या पावसाने पाचशेच्या टप्पा देखील ओलांडला आहे.
देवगड तालुक्यात पावसाने हाहाकार केला असून मध्यरात्री झालेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.सलग सात दिवस पावसाने तळच ठोकला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सुरू असलेली कामे पूर्णतः ठप्प झालेली आहेत. पूलासाठी तयार केलेले पर्यायी रस्ते देखील वाहून गेले आहेत. पावसामुळे वीजपुरवठा पूर्णता खंडित झाला होता. तिर्लोट येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसविण्यात आलेले सौरपथदीपही पावसामुळे कोसळले.
मिठबाव तांबळडेग मार्गावर आंब्याची झाडाची फांदी पडल्याने मार्ग पूर्णता बंद झाल्याने कणकवली येथे जाणारी एसटी अडकून पडली होती . एसटी कर्मचारी लक्ष्मण लोके त्याच गाडीने आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांनी तात्काळ गावातील ग्रामस्थांना बोलावून त्याच्या मदतीने ते झाड तोडून तात्काळ बाजूला करून वाहतुकीस मार्ग खुला केला. रेंबवली येथील श्री. संजय चंद्रकांत वळंजू यांचे घरावर पहाटे साडेपाचच्या सुमारास शेवग्याचे झाड पडल्यामुळे अंशतः नुकसान झाले. देवगड पवनचक्की येथे असलेल्या काही स्टॉलची छप्पर देखील या पावसाने उडाल्याने येथील स्टॉल धारकांचेही नुकसान झाले आहे.
मध्यरात्री झालेल्या या पावसात अनेक ठिकाणी पावसाची पाणी तुंबल्याने वाहत रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा झाला. ठिकठिकाणी सकल भागातील रस्ते कॉजवे देखील पाण्याखाली गेले होते.
मिठमुंबरी,कोटकामते, खुडी, वाडा नारिंग्रे, मिठबाव,हिंदळे, बापर्डे,तिर्लोट,पुरळ, आदी भागातील शेतजमिनी माड बागायची पाण्याखाली गेल्या होत्या.मुसळधार अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते सकाळी ११ नंतर पावसाचा वेग कमी झाला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गटांराची जेसीबीच्या साह्याने तात्पुरती खोदाई करून रस्त्यावर साचलेले पाणी मार्गस्थ केले त्यामुळे वाहतूक सुरू झाली.



