सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा – सुशांत नाईक ; अंमलीपदार्थ विक्रीला आळा घालण्यास पोलीस यंत्रणा ठरली कुचकामी
अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना आणि अवैध धंद्यांना पोलिसांनी आळा न घातल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम अंमलीपदाथांची विक्री होत आहे. अंमलीपदाथांच्या आहारी गेल्याने युवा पिढी बरबाद होत चालली आहे. त्यामुळे अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा बीमोड करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे. मात्र, अंमलीपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. जिल्ह्यात अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून या धंद्यांना आळा बसावा म्हणून प्रशासन व पोलीस यंत्रणा काहीच काम करीत नाही. अवैध धंद्यांच्या रॅकेटमधील मंडळी व्हॉटस्अॅप स्टेटसवर पालकमंत्री नितेश राणे यांचा फोटो लावत आहेत.
त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांचे अभय आहे का? असा सवाल शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. येत्या १५ दिवसांत अंमलीपदाथांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा बीमोड आणि अवैध धंद्यांचा पोलिसांनी आळा न घातल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशारा नाईक यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. नाईक बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेनेचे पदाधिकारी गुरूनाथ पेडणेकर, धीरज मेस्त्री, रोहित राणे, योगेश धुरी, अमित राणे, गुरू गडकर आदी उपस्थित होते.
सुशांत नाईक म्हणाले, अंमलीपदार्थांचा विळखा सिंधुदुर्ग जिल्हा पडला आहे. गोव्यातून जिल्ह्यात अंमलीपदार्थांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे. युवा पिढीला अंमलीपदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने युवा पिढी अंमलीपदार्थ सेवन करीत आहे. अंमलीपदाथांच्या सेवनामुळे युवा पिढी बरबाद होऊ लागली आहे. गोव्यातून सिंधुदुर्गातील शहर व ग्रामीण भागात होणारी अंमलीपदार्थांची होणारी विक्री रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे, असा आरोप त्यांनी केला.
पालकमंत्रीपदाची सूत्रे नितेश राणे यांनी हाती घेतल्यानंतर माझ्या जिल्ह्यात अंमलीपदार्थांची विक्री होऊ देणार नाही, अवैध धंदे चालू देणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यानंतर एक महिना हे सर्व अवैध धंद्यांना ब्रेक्र लागला होता. मात्र, पुन्हा अवैध धंदे सुरू झाले आहेत.असे नाईक यांनी सांगितले.