कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचे 9 पुरस्कार जाहीर ; 2 मे रोजी कणकवलीत पुरस्कार वितरण

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचे 9 पुरस्कार जाहीर ; 2 मे रोजी कणकवलीत  पुरस्कार वितरण

सौ. उमा काणेकर आदर्श शिक्षिका पुरस्कार वंदना राणे, मालवणी भाषा पुरस्कार दादा मडकईकर यांना जाहीर 
कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्ट यांच्याकडून विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, लेखक महेश काणेकर यांनी केली. त्यामध्ये कै. सौ. उमा काणेकर आदर्श शिक्षिका पुरस्कार वंदना राणे, मालवणी भाषा पुरस्कार दादा मडकईकर, साहित्य कला पुरस्कार प्रमोद कोयंडे, व्यक्तिमत्व विकास प्रेरणा पुरस्कार सदाशिव पांचाळ, समाजभूषण पुरस्कार सागर शिंदे यांच्यासह इतर चार व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ 2 मे रोजी दुपारी 3.30 वाजता सिंधुदुर्गचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भा. प्र. से) रविंद्र खेबुडकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, ज्येष्ठ बाल साहित्यिक बाबुराव शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली नगर वाचनालयाच्या पूज्य आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात वितरित केले जाणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
गेली 15 वर्षे या ट्रस्टच्या माध्यमातून विविध पुरस्कार देऊन त्या व्यक्तींना प्रोत्साहन दिले जात आहे. तसंच, शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ दिले जात आहे. यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमधील कै. सौ. उमा काणेकर आदर्श शिक्षिका पुरस्कार वंदना नारायण राणे यांना तर उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार सौ. नेहा राणे यांना जाहीर झाला आहे.
मालवणी भाषा भूषण पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर हे सुप्रसिद्ध मालवणी कवी असून महाराष्ट्र आणि गोवा राज्यात विविध ठिकाणी त्यांच्या मालवणी कवितांचे असंख्य कार्यक्रम झालेले आहेत. शिवाय, त्यांची अनेक मालवणी गीतेही संगीतबद्ध केली असून अलीकडच्या गीताला पुरस्कारही प्राप्त झाला आहे. मालवणी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी दादा मडकईकर सातत्याने प्रयत्नशील आहेत. तसेच, कोल्हापूर येथील श्रीमती नम्रता इंगळे कांदळकर यांना हिरकणी प्रेरणा पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
साहित्य कला पुरस्कार जाहीर झालेले प्रमोद कोयंडे हे लेखक, कवी, वक्ते आणि अभिनेते आहेत. त्यांची पुस्तके प्रकाशित झाली असून वाचकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वाचकाला आवडेल असे लेखन ते सातत्याने करत आहेत.
नेरूर कुडाळ येथील श्री कलेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ नेरुरचे सिद्धेश सुधीर कलिंगण यांनाही लोककलेसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. सिंधुदुर्गाची दशावतार ही लोककला त्यांनी आपल्या नाट्य मंडळाकडून अनेक दशके टिकवून ठेवली आहे. तर कणकवली तालुक्यातील तळेरे येथील मोटीवेशनल स्पीकर, एज्युकेशनल ॲडव्हायझर सदाशिव पांचाळ यांना व्यक्तिमत्व विकास प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदाशिव पांचाळ यांनी गेली 20 वर्षे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात लाखो मुलांना व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल विविध वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्यांनी घेतलेली आहे. तर सागर शिंदे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून शिंदे हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर मालवण तालुक्यातील रांगोळी या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडलेल्या कलाशिक्षक समीर चांदरकर यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समीर चांदरकर हे रांगोळीकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. आणि त्यांनी आपल्या या कलेने अक्षरश: जिल्ह्याचे नाव राज्यभर पोहोचले आहे.
यांचा विशेष सन्मान 
यावेळी विशेष सन्मान म्हणून उत्कृष्ट तबलावादक गिरीश कामत, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, लोककला सेवक प्रा. हरिभाऊ भिसे, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते संदेश रावले यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्कार घोषणावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर, ज्येष्ठ बाल साहित्यिक बाबुराव शिरसाट, ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रशांत काणेकर, प्रसिद्धीप्रमुख निकेत पावसकर उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *