कणकवली (प्रतिनिधी)
निलेश, नितेशच्या विजयाने फार आनंद – खासदार नारायण राणे
बाळासाहेबांनी आपला पक्ष सत्तेत आणला, मात्र उद्धव ठाकरे यांनी तो साफ केला. शिवसेना संपवण्याचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत. उद्धव ठाकरे यांचा सुफडा साफ झाला असून संजय राऊत यांचे तोंडही काळे झाले आहे. आमचा आज विजय झाला आहे. जशा पद्धतीने विरोधक आमच्या पक्षाचा उल्लेख करीत होते, ते पाहता त्यांना त्यांची औकात समजली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली.
श्री. राणे म्हणाले, माझ्या मतदारसंघात सर्वच्या सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. त्यांनी समन्वय साधून निलेश आणि नितेश यांना तिकिटे दिली. दोघांनाही आशीर्वाद दिले आणि दोघांनीही विजय खेचून आणला. खूप आनंद झाला.
निवडणुकीत विरोधक नाहक घराणेशाहीचा आरोप करीत होते. मात्र माझे दोन्ही मुलगे पूर्वीपासूनच राजकारणात आहेत. त्यामुळे विरोधकांनी नाहक टीका केली. मात्र जनतेने विकासाला साथ दिली. निलेश आणि नितेशच नव्हे, तर केसरकरना पण निवडून आणलं. तिथे विरोधकांनी पैसे वाटूनही काही फायदा झाला नाही. आता फक्त है पैसे त्यांनी कुठून आणले ते पहावे लागेल, असेही ते म्हणाले,
