देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी हेमंतकुमार कुळकर्णी, सचिवपदी दिनेश साटम तर खजिनदारपदी महेश तेली पदी बिनविरोध निवड
देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी हेमंतकुमार कुळकर्णी यांची, तर सरचिटणीसपदी दिनेश साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.उमाबाई बर्वे लायब्ररीच्या स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत देवगड तालुका पत्रकार समितीची सन २०२५-२०२७ या दोन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
देवगड तालुका पत्रकार समितीची विशेष सभा मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा निवडणूक निरीक्षक संतोष राऊळ, किशोर जैतापकर, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. व्यासपीठावर पत्रकार समितीचे मावळते अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सचिव सचिन लळित आदी उपस्थित होते. या सभेत पत्रकार समितीची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी हेमंतकुमार कुळकर्णी, उपाध्यक्षपदी दयानंद मांगले, अनिल राणे, सरचिटणीसपदी दिनेश साटम, सहचिटणीसपदी सचिन लळित, कोषाध्यक्षपदी महेश तेली, कार्यकारिणी सदस्यपदी अयोध्याप्रसाद गावकर, सुरज कोयंडे, राजीव पडवळ, विश्वास मुणगेकर, संतोष साळसकर, नागेश दुखंडे, स्वप्नील लोके यांची निवड करण्यात आली. तर पालक सदस्य म्हणून जिल्हा प्रतिनिधी प्रशांत वाडेकर (पदसिद्ध), जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके (पदसिद्ध) यांची निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष हेमंत कुळकर्णी म्हणाले, पत्रकारांना रोजच्या वृत्तसंकलनासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. डिजिटलायझेशनच्या युगात पत्रकारांना प्रशिक्षण महत्वाचे असून या सुविधाही उपलब्ध झाल्या पाहिजेत. एआय तंत्रज्ञान सर्व सदस्यांना उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करू. पत्रकारांचे दैवत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले येथे भव्य दिव्य स्मारक उभारावे, अशी सर्वच मराठी पत्रकारांची इच्छा आहे. यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार आहोत. पत्रकारांची गरिमा व समाजातील पत्रकारांचे स्थान उंचावले पाहिजे, यासाठीही काम करू असे त्यांनी सांगितले.
देवगड शहरातून दैनिक सकाळ तालुका प्रतिनीधी म्हणून आपल्या पत्रकारितेचा श्री गणेशा १९९६ पासून सुरू केला. , त्यानंतर दैनिक पुढारी सध्या दैनिक प्रहार, व प्रहार डिजिटल मधून आपली पत्रकारिता त्यांनी सुरु ठेवली आहे.आता पर्यंत त्यांनी अनेक सामाजिक संघटनेचे नेतृत्व केले आहे.मात्र पत्रकारितेतील आता पर्यंतच्या प्रवासात त्यांनी देवगड तालुका समितीचे पद भूषविले नसल्याने यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकाराने त्यांच्या नावाला पसंती देत त्याची बिनविरोध निवड केली. अँड हेमंत कुळकर्णी यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


