माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर वाढदिवस विशेष….
संकटकाळी शड्डू ठोकतो तोच खरा शिवसैनिक…!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेला दुसरा वाघ पुढे आला. .. आणि शिवसेनेचा तो ढाण्या वाघ म्हणजेच परशुराम उपरकर…!
नाव आणि पक्षचिन्ह चोरून सुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आजही त्याच ताकदीने उभी आहे कारण शिवसैनिकांनी आपले रक्त रस्त्यावर सांडून वाढवलेली ही संघटना आहे. शिवसेना या चार अक्षरांसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवुन काहीही करण्याची तयारी असलेली शिवसैनिकांची फळी शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत तयार झाली होती. माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर हे त्याच फळीतील एक नाव आहे.
विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी तिकीट कापल्याने नाराज होऊन परशुराम उपरकरांनी २०१२ साली शिवसेना सोडली. राजकारणात जर-तरला काहीच अर्थ नसतो. तरीसुद्धा काही गोष्टी काळाच्या पटलावर जर-तरच्याच कसोटीवर पडताळून पाहाव्या लागतात. जर त्यांनी शिवसेना सोडली नसती तर दोन वर्षानंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत हे विधानपरिषदेत आमदार असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांनाच मिळाली असती. २०१४ साली मोदी लाटेत शिवसेनेचे जे १८ खासदार निवडून आलेत, त्यात त्यांचा सुद्धा निश्चितपणे समावेश झाला असता. २०१९ साली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात समोर अपक्ष उमेदवार उभा असल्यामुळे ते पुन्हा एकदा निर्विवादपणे खासदार बनले असते. अशा प्रकारे शिवसेना सोडल्यामुळे त्यांनी दोन टर्म लोकसभेची खासदारकी गमावली. त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. मात्र तब्बल एका तपानंतर त्यांनी आपली राजकीय चुक सुधारली. ज्या पक्षाने आपल्याला राजकीय जन्म दिला, तो पक्ष आज चाहूबाजूनी संकटात सापडलेला असताना परशुराम उपरकर नामक कडवट शिवसैनिक पुन्हा एकदा स्वगृही परतला.
नव्वदच्या दशकात जनता दल आणि काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन जीजी उपरकर नावाचा तरुण मुंबईत सर्वदूर पसरलेल्या शिवसेनेची पाळेमुळे सिंधुदुर्गात रुजवू पाहत होता. त्यावेळी संघटनावाढीसाठी ज्या-ज्या वेळी शिवसैनिकांचे विरोधी पक्षासोबत राजकीय राडे झाले, तेव्हा कणकवलीच्या रस्त्यावर अनेकांनी त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले आहे. त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी पोलीसांच्या मदतीने त्यांना मारहाण केली. मात्र दस्तरखुद्द शिवसेनाप्रमुखांकडून बाळकडू प्यायलेल्या या कडवट शिवसैनिकाने हा पोलीसी छळ तितक्याच हिंमतीने सहन केला, रस्त्यावर रक्त सांडले पण खांद्यावरचा भगवा ध्वज कधीही खाली पडू दिला नाही. जशी भगीरथाने अथक प्रयत्न करून गंगा पृथ्वीतलावर आणली होती, तशाच प्रकारचे भगीरथ प्रयत्न करून समाजवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी शिवसेनेचा भगवा विचार रुजवला. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून १९८३ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘भगवा सप्ताह’ आयोजित करण्यात आले. १९८८ साली कणकवली ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागली. परशुराम उपरकरांनी ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एरव्ही काँग्रेस व जनता दल पक्षाचे जिल्ह्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात विळी-भोपळ्याचे वैर होते परंतु सिंधुदुर्गात शिवसेनेचा भगवा विचार रुजवू पाहणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिलेदाराला या पोटनिवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेस व जनता दल पक्षाने युती केली. या ग्रामपंचायत पोटनिवडणूकीची दखल दस्तरखुद्द शिवसेनाप्रमुखांनी घेतली. ‘साप्ताहिक मार्मिक’मध्ये व्यंगचित्र रेखाटून त्यांनी काँग्रेस व जनता दलाच्या युतीचा ‘अभद्र युती’ म्हणून उल्लेख केला. सरतेशेवटी जीजींनी या पोटनिवडणूकीत दणदणीत विजय मिळवून अभद्र युतीच्या छाताडावर बसून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याही निवडणुकीत शिवसेना पक्षाला मिळालेला हा पहिला विजय होता. नव्वदच्या दशकात तळकोकणात शिवसेना रुजवण्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वरचढ राहिलेल्या समाजवाद्यांना आणि कॉंग्रेसच्या पांढरपेशा नेतेमंडळींना हा कडवट शिवसैनिक अक्षरशः पुरून उरला. बघता-बघता तळकोकणात शिवसेना फक्त रुजलीच नाही तर अवघा कोकण प्रांत भगवामय झाला. त्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना फोफावण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत सर्वात जास्त त्याग कोणी केला असेल, पक्षासाठी विरोधकांचे वार अंगावर झेलून आपले रक्त कोणी सांडले असेल तर ते फक्त परशुराम उपरकरांनीच…!
नारायण राणे यांचे बंड हा शिवसेनेसाठी खरोखरच कसोटीचा काळ होता. त्यांच्यासोबत कोकणातील इतर १५ समर्थक आमदारांनी राजीनामे दिले. ज्या मुंबईत शिवसेनाप्रमुखांचे वर्चस्व होते त्याच मुंबईत ‘दैनिक सामना’च्या कार्यालयासमोरील शिवसेनेच्या सभेचा मंडप जाळून नारायण राणेंनी जशास तसे उत्तर दिले होते. आता अशा आक्रमक नेत्याला तळकोकणात आणि खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोखणे म्हणजे साक्षात वाघाच्या गुहेत जाऊन त्याला ललकारण्यासारखेच होते. हे आव्हान स्वीकारण्यासाठी कुणीही धजावत नव्हते. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि या वादळात सर्वात जास्त पडझड बालेकिल्ल्यातच झाली होती. आता पुन्हा एकदा ढासळलेल्या बालेकिल्ल्याची उभारणी करणे एवढा एकच पर्याय पक्षनेतृत्वासमोर शिल्लक होता. पण संघटनावाढीचे हे शिवधनुष्य पेलवणार कोण…? हाच खरा प्रश्न होता.



