मिठबाव श्री देव रामेश्वर,चैत्र नवरात्र उत्सव – एक अध्यात्मिक संगम : शिव, विष्णू आणि रामाच्या उपासनेचा वार्षिक सोहळा

0 minutes, 2 seconds Read

 

देवगड (स्वप्नील लोके)

मिठबाव श्री देव रामेश्वर,चैत्र नवरात्र उत्सव – एक अध्यात्मिक संगम : शिव, विष्णू आणि रामाच्या उपासनेचा वार्षिक सोहळा

 

मिठबाव, तांबळडेग आणि कातवण या तीन गावांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिरात दरवर्षी चैत्र महिन्यात साजरा होणारा चैत्र नवरात्र उत्सव हा एक अद्वितीय आणि पुरातन परंपरा असलेला उत्सव आहे. यावर्षीचा हा उत्सव विशेष महत्त्वाचा ठरतो आहे कारण कुणकेश्वरच्या श्री रामेश्वर देवाची भेट सुमारे तीनशे वर्षांनी झाल्यानंतर, स्थानिक परंपरेनुसार आणि शिवकळेच्या आदेशानुसार उत्सवाची नव्याने आणि भक्तिभावाने सुरुवात झाली आहे.

 

चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात व कालावधी फाल्गुन महिन्याच्या होळी पौर्णिमेनंतर चैत्र महिन्याची सुरुवात होते. याच दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा येते आणि या दिवसापासून शिव-विष्णू नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो.हा उत्सव होळी पौर्णिमा ते हनुमान जयंती – म्हणजे जवळपास एक महिना चालतो. यामध्ये गुढीपाडवा, रामनवमी आणि हनुमान जयंती हे तीन प्रमुख सण देखील सामावलेले असतात.

 

 

उत्सवाची परंपरा व भक्तिपूर्ण उपक्रम:
या उत्सव कालावधीत दररोज सायंकाळी मंदिरात पूजा, पुराण वाचन,भक्ती संध्या व ,गायन कार्यक्रम,कीर्तन,त्यानंतर पालखी प्रदक्षिणा अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे गावातील प्रत्येक वयोगटातील लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. ग्रामदैवत श्री देव रामेश्वराच्या या उत्सवामुळे गावात एक उर्जित वातावरण निर्माण आहे.

 

 

या नवरात्र उत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे हा शिव आणि विष्णू दोघांचा एकत्रित उपासनेचा उत्सव मानला जातो. यामागील धार्मिक संदर्भ असा आहे की, राम हे विष्णूचे सातवे अवतार आहेत. त्यामुळे चैत्र नवरात्रातील रामनवमी ही केवळ रामाचा जन्मदिवस नसून, विष्णूच्या शक्तीचे पूजन देखील मानले जाते.रामाचे शिवभक्त म्हणून असलेले स्थान महत्त्वाचे आहे. रामायणात रामाने रामेश्वर येथेच शिवलिंगाची स्थापना करून शिवाची पूजा केली होती.त्यामुळे चैत्र नवरात्र हा शिव आणि राम (विष्णू) या दोघांचाही उत्सव मानला जातो.हनुमान हे रामाचे परमभक्त आणि शिवाचे रुद्रावतार मानले जातात.हनुमान जयंतीच्या दिवशी राम व शिव या दोघांच्या भक्तीचे संगम म्हणून पूजा केली जाते.त्यामुळे या उत्सवाचा परमावधी हनुमान जयंतीला होतो, ज्यात संपूर्ण चैत्र महिन्याच्या भक्तीचे फल मिळते.

 

या उत्सवाच्या निमित्ताने गावातील सामाजिक एकात्मता वृद्धिंगत होते. अनेक वर्षे खंडित झालेली परंपरा पुनरुज्जीवित करून गावकऱ्यांनी गौरवशाली इतिहासाची आठवण आणि धर्मपरायणतेचा वारसा जपला आहे. प्रत्येक कार्यात एकोप्याची भावना दिसून येते, जी या उत्सवाच्या मूळ हेतूशी सुसंगत आहे.चैत्र नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक पूजांचा कार्यक्रम नसून शिव, राम आणि हनुमान यांच्याशी जोडलेली एक आध्यात्मिक यात्रा आहे. या एकत्रित भक्तीमुळे श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा यांचा संगम घडतो. श्री देव रामेश्वर मंदिराच्या वार्षिक कार्यक्रमाने या उत्सवाला एक नवे रूप दिले असून, यामधून प्राचीन परंपरेचा गौरव आणि नवा अध्यात्मिक प्रकाश मिठबाव , तांबळडेग, कातवण गावांना मिळाला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *