नारायण राणे यांचे जिल्हा विकासाचे स्वप्न दृष्टिक्षेपात… ; किनारपट्टीवर कोट्यवधीचा निधी मंजूर…..
पर्यटनातून रोजगारनिर्मितीवर भर…. ; पालकमंत्र्यांनी घेतली जबादारी…..
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास व्हावा, याठिकाणी मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा यासाठी खासदार नारायण राणे यांनी पाहिलेली स्वप्ने आता पूर्णत्वास येण्यास सुरुवात झाली आहे. ना. राणे यांचे व्हिजन पूर्णत्वास आणण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे आणि त्यांच्या जोडीला माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत. माजी पालक मंत्री रवींद्र चव्हाणही जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष ठेवून आहेत. किनारपट्टीसाठी शेकडो कोटींचा निधी मंजूर असून खा. राणे यांचे जिल्हा विकासाचे स्वप्न दृष्टिक्षेपात आले आहे.
पालकमंत्री ऑन फील्ड……
पर्यटन आणि रोजगाराच्या माध्यमातूनच सिंधुदुर्गच्या किनारपट्टीचा विकास शक्य आहे. खासदार राणे यांचे हे व्हिजन पूर्ण करण्याची प्रमुख जबाबदारी पालकमंत्री या नात्याने त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांनी त्या दृष्टीने मांडणींकरून पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. पालकमंत्री राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक विकास प्रकल्पांना मंजुरी मिळतानाच कोट्यवधी रुपयांच्या निधीचीही तरतूद झाली आहे. सागरी पर्यटनाला जागतिक दर्जा देण्यासाठी पालकमंत्री ऑन फील्ड आले आहेत.
नियमित विमानसेवा राणेंचे ध्येय….
परुळे चिपी येथील विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे खासदार नारायण राणे यांचे ध्येय आहे. यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. मागील वर्षभरात चिपी विमानतळावरून येजा करणाऱ्या विमानांमध्ये अनियमितता येत विमानसेवा ठप्प झाली होती. नुकतीच खा. नारायण राणे यांनी मुंबई चिपी मुंबई अशी विमानसेवा सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. याचेच फलित म्हणून १८ एप्रिल पासून एअर अलायन्सची मुंबई चिपी मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो या कंपनीची विमानसेवा सुरू होण्यासाठी खा.राणे प्रयत्नशील आहेत.
केसरकरांच्या व्हिजनाला सुरुवात…….
माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गात पाणबुडी पर्यटनाचे व्हिजन मांडले होते. जिह्यात पाणबुडी पर्यटन सुरू होऊन पर्यटनाला जागतिक दर्जा मिळावा अशी केसरकर यांची संकल्पना होती. याच संकल्पनेनुसार पाणबुडी पर्यटन दृष्टिक्षेपात आले आहे. याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला येथे तब्बल. ३८ कोटी रुपये खर्चून पाणबुडी साठी धक्का बांधण्यात येत आहे. त्याच प्रमाणे पर्यटनाच्या माध्यमातून परिसर विकासावरही मोठा निधी खर्च होत आहे.
मालवणात बंधाऱ्यांना मोठा निधी….
मालवण तालुक्याचा विचार करतता खा. राणे यांच्या माध्यमातून २०१४ पूर्वी किनारपट्टीवरील अनेक बंधारे झाले आहेत. मात्र त्यानंतर येथील विकास ठप्प होता. मालवण मधील कुठल्याही किनारपट्टीवर निधी उपलब्ध झाला नाही. मात्र, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. अनेक बंधारे, अनेक विकास प्रकल्प मंजूर झाली आहेत. देवबाग गावासाठी १५८ कोटी मंजूर झाले आहेत.