श्री क्षेत्र हडपीड असे बनले स्वामी भक्तांच्या संकल्प सिद्धीचे केंद्र

0 minutes, 8 seconds Read

 

देवगड (स्वप्निल लोके)

 

 

श्री क्षेत्र हडपीड असे बनले स्वामी भक्तांच्या संकल्प सिद्धीचे केंद्र

 

 

स्वामी समर्थांची कृपा: श्रद्धेचा अद्भुत अनुभव

 

कोकणात श्रद्धा आणि भक्तीचा गड निर्माण करण्याचे स्वप्न घेऊन काही स्वामीभक्तांनी जोगेश्वरी, मुंबई येथून एक नवा अध्यात्मिक प्रवास सुरू केला. मूळ देवगड तालुक्यातील जामसंडे खाकशी येथील असलेले नंदकुमार तुकाराम पेडणेकर व शिरगाव निमतवाडी येथील श्री प्रभाकर धाकू राणे यांचे स्वप्न त्यांच्या स्वामीभक्त मित्र परिवाराने श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून कोकणात श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन करण्याचा संकल्प केला आणि या दिशेने आपली वाटचाल सुरू केली.

 

 

 

स्वामींच्या कृपेने मठासाठी योग्य जागेचा शोध घेताना देवगड, जामसंडे,खाकशीवाडी ,दाभोळे शिरगाव, तळेबाजार आदी ठिकाणी प्रयत्न झाले, मात्र स्वामींची अनुभूती मिळाली नाही. अखेर देवगड-निपाणी महामार्गाजवळ, शिरगाव येथील सहदेव लोके यांच्या मालकीच्या हडपीड येथील डोंगरावर स्वामींनी आपले स्थान निश्चित केले.विशेष म्हणजे,याच ठिकाणापासून पुढे १०० मीटर अंतरावर श्री दत्तगुरूंचे एकमुखी मंदिर तर २ किलोमीटरवर मागे श्री नृसिंह सरस्वती अध्यात्मिक केंद्र आहे.

 

 

     

स्थापनेपासून ते समृद्धीपर्यंतचा प्रवास असा :

२०१० मध्ये २ एकर ८८ गुंठे जागा २८ लाख रुपयांना विकत घेण्यात आली. ४ जुलै २०११ रोजी मुंबई विलेपार्ले येथील स्वामीभक्त अण्णा अलाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून एका छोट्या मठाची स्थापना करण्यात आली. पुढे भक्तांनी दिलेल्या योगदानातून २०१७ मध्ये परमपूज्य राऊळ महाराज यांच्या हस्ते नवीन मठाच्या पायाभरणीचा विधी पार पडला. २०१९ मध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी या भव्य मठाचे उद्घाटन करण्यात आले.या मठात प्रकट दिन ते दत्त जयंती दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे होतात. यामध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी,गुरुपौर्णिमा उत्सव,त्रिपुरारी पौर्णिमा, दत्तजयंती उत्सव सोहळा त्याच बरोबर स्वामी नामस्मरण, अखंड नामजप, गुरुचरित्र पारायण,धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, नेत्रतपासणी,समाजोपयोगी उपक्रमही मंडळाच्या वतीने राबवले जातात.

मठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आतापर्यंत सहा संतांच्या दिव्य पादुका दर्शन,साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन, विठ्ठल-रुखुमाई व संतदर्शन सोहळे पार पडले आहेत. यावर्षी पुणे जेजुरी गड येथील मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या देखाव्याचे सादरीकरण होणार आहे.

 

 

 

या मठाच्या यशस्वी व्यवस्थापनामध्ये खालील सदस्यांचा मोलाचा वाटा आहे .संस्थापक अध्यक्ष: प्रभाकर धाकू राणे,संस्थापक सचिव: नंदकुमार तुकाराम पेडणेकर,विश्वस्त खजिनदार: ज्ञानेश्वर राऊत,कार्यकारिणी सदस्य: मोनिश पेडणेकर, अभिषेक राणे,तसेच स्वामी भक्त कोकण कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे,सुजित कदम,श्री मारूती जंगम,अनंत जंगम,नितीन म्हापसेकर, प्रभाकर यशवंत राणे,सचिन लोके,समीर शिरवडकर व स्थानिक गाव समिती व श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरीत मुंबई यांच्या योगदानातून विविध उपक्रम पार पडतात.

 

 

 

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार,जोगेश्वरी, मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून भक्तांसाठी आत्मशांती आणि आध्यात्मिक उन्नतीचे पवित्र स्थान आहे. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या स्वामींच्या वचनाने प्रेरित होऊन भक्त या स्थळी येतात आणि त्यांना अपार शांती, समाधान आणि भक्तीचा अनुभव मिळतो.या मठाचा प्रवास ही श्रद्धेची आणि भक्तीची प्रेरणादायी कहाणी आहे. काही भक्तांच्या निश्चयाने आणि स्वामींच्या कृपेने एका छोट्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या मठाने हजारो भक्तांना एकत्र आणले आहे. कोकणातील हे भक्तिस्थळ भविष्यात आणखी तेजस्वी होईल आणि स्वामींच्या आशीर्वादाने भक्तगणांसाठी मार्गदर्शन करत राहील.

 

स्वामी समर्थांची कृपा: श्रद्धेचा अद्भुत अनुभव

 

 

 

 

स्वामी या शब्दाचा खरा अर्थ आहे स्वार्थ आणि अहंकाराचा त्याग करून पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित होणे. जो “मी आणि माझे” या भ्रमातून मुक्त होतो,तोच खऱ्या अर्थाने स्वामी समर्थांचा भक्त होतो. मात्र, आज अनेकजण “हे मी केलं, ते मी केलं, मी होतो म्हणून झाले”असा अहंकार मिरवताना दिसतात.अशा प्रत्येक भक्तानी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

   

 

    अनन्य शरणागतीचा चमत्कारिक अनुभव ,जो स्वामींना संपूर्ण भावनेने शरण जातो,त्याच्या प्रत्येक अडचणीला, संकटाला तोंड देण्यासाठी स्वामी समर्थ स्वतःधावून येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दोन वर्षांपूर्वी हडपीड मठातील एक भक्त शेखर राणे यांनी अनुभवलेली कृपा.गुरुवारच्या दिवशी,आपले काम आटपून स्वामींच्या आरतीला पोहोचण्यासाठी निघालेले राणे दाम्पत्य अचानक गगनबावडा घाटात तीनशे फूट खोल दरीत कोसळले. अपघात भीषण होता, परंतु स्वामी समर्थांच्या कृपेने ते दोघेही पूर्णपणे सुखरूप बचावले. हा फक्त योगायोग नव्हता, तर हे होते भक्तीच्या शरणागतीचे आणि श्रद्धेच्या बळाचे प्रत्यंतर.श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी हा प्रसंग एक मोठा संदेश देतो – शुद्ध भक्ती आणि संपूर्ण शरणागती असेल, तर कोणतेही संकट आपल्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच, केवळ भक्तीचा दिखावा न करता, अहंकार सोडून स्वामींना अनन्य भावाने शरण जाणे हेच खरे स्वामी भक्तांचे लक्षण आहे.

 

 

श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी समर्थ !

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *