सावंतवाडी मेडिकल असोसिएशन तर्फे द काँशन्स या नाट्यप्रयोगाचे आयोजन
सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल या गावातील दयासागर छात्रालय या निराधार दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या मदतीसाठी द कॉन्सन्स या नाट्यप्रयोगाचे आयोजन सावंतवाडी मेडिकल असोसिएशन तर्फे करण्यात आले होते.
बाबा वर्दम थिएटर कुडाळ द्वारा निर्मित या नाट्य मध्ये डॉ गुरुराज कुलकर्णी, डॉ संजीव आकेरकर आणि सौ.शमा नाईक यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत तसेच या नाटकाचे दिग्दर्शन श्री केदार सामंत यांनी केले आहे.
क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणाऱ्या या नाट्यप्रयोगामध्ये मनुष्याच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडले आहेत. या नाट्यप्रयोगास सावंतवाडी कुडाळ आणि परिसरातील डॉक्टर सामान्य नागरिक आणि नाट्य रसिक यांनी भरभरून दाद दिली. या नाट्यप्रयोगासाठी सावंतवाडी चे उपविभागीय अधिकारी श्री हेमंत निकम तसेच भोसले नॉलेज सिटी चे संस्थापक श्री अच्युत सावंत भोसले हे आवर्जून उपस्थित होते. या नाट्यप्रयोगातून संकलित झालेल्या निधीचे रोणापाल येथील दयासागर छात्रालयास देणगी म्हणून देत असल्याचे सावंतवाडी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ यांनी जाहीर केले. याप्रसंगी श्री हेमंत निकम प्रांताधिकारी सावंतवाडी तसेच श्री अच्युत सावंत भोसले यांच्या उपस्थितीत रुपये एक लाख एक एवढ्या रकमेचा धनादेश दयासागर छात्रालयाचे व्यवस्थापक श्री जीवाबा वीर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री जिवाबा वीर यांनी सावंतवाडी मेडिकल असोसिएशन चे आभार व्यक्त केले तसेच दयासागर छात्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेकविध उपक्रमांची माहिती नागरिकांना दिली. छात्रलयाच्या मदतीने यशस्वी झालेले काही विद्यार्थी , विद्यार्थीनी देखील याप्रसंगी उपस्थित होते.
सावंतवाडी मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य डॉक्टर याप्रसंगी सहपरिवार उपस्थित होते. निमंत्रित मान्यवरांचे स्वागत सावंतवाडी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजेश नवांगुळ यांनी केले. नाट्य कलावंतांचे स्वागत डॉ संजना देस्कर ,डॉ नेत्रा सावंत डॉ कश्यप देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ संजय दळवी यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ गोविंद जाधव यांनी केले.