बांदा (प्रतिनिधी)
इन्सुली पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीची दारुची वाहतुक प्रकरणी चारचाकी वाहनासह १३ लाख २५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त
राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीची दारुची वाहतुक प्रकरणी चारचाकी वाहनासह १३ लाख २५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. रत्नागिरी येथील चालकाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशिरा जुना पत्रादेवी-बांदा रोड, पंजाबी ढाब्याजवळ करण्यात आली.
इन्सुली कार्यालयातून मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग अधीक्षक, मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार जुना पत्रादेवी-बांदा रोड, पंजाबी ढाब्याजवळ, बांदा येथे शुक्रवारी संध्याकाळी उशिरा अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीच्या संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना चारचाकी वाहन ( एमएच०५ एस७७५०) या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या पाठीमागील सीटवर व डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारुच्या विविध ग्रॅन्डचे ४२ बॉक्स अवैध मद्यसाठा मिळून आला. सदर प्रकरणी वाहन चालक प्रथमेश दिपक भाटकर(वय २९ वर्षे रा. तवसाळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. यामध्ये ३ लाख २५ हजार २०० किंमतीचे दारु व रु. १० लाख किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण १३=लाख २५ हजार २०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, विवेक कदम, धनंजय साळुंखे, जवान नि. वाहन चालक रणजीत शिंदे, जवान दिपक वायदंडे, जवान सागर सुर्यवंशी,जवान अभिषेक खत्री यांनी केली.
सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली प्रदीप रास्कर हे करीत आहेत.
