बांदा (मंगल कामत) २६ जुलै २०२४
मडूरे पंचक्रोशीत वीज गायब असल्याने सहाय्यक अभियंत्यांना रोखून धरले ; तणावाची स्थिती : घटनास्थळी पोलीस बंदोबस्त
मडूरा पंचक्रोशीतील गावांमध्ये गेले चार दिवस लाईट गायब असल्याने संतप्त ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना गावात रोखून धरले. जोपर्यंत लाईट सुरू होत नाही तोपर्यंत सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. केवळ एक वायरमन व एक आऊटसोर्सिंगचा कर्मचारी घेऊन आल्याने ग्रामस्थ अभियंता यादव यांच्यावर संतापले. सावंतवाडी उप अभियंता कुमार चव्हाण यांनी फोनवर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. सायंकाळी उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. बांदा पोलिसांचा घटनास्थळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मडूरा, कास, सातोसे, रोणापाल गावात गेले चार दिवस वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे महिलांसह विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. लाईट नसल्याने नळ पाणीपुरवठा बंद आहे. बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचा रोष आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी सायंकाळी उमटले. ग्रामस्थांनी तीव्र शब्दात महावितरण कंपनीच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.
सावंतवाडी उप अभियंता चव्हाण यांनी गुरुवारी वीज ग्राहकांसोबत झालेल्या बैठकीत शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात आवश्यक कामगार उपलब्ध करून न दिल्याने समस्या कायम आहे. ग्रामस्थांशी फोन वरून झालेल्या चर्चेत त्यांनी हात वर केल्याने ग्रामस्थ अधिकच संतापले. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अभियंता यादव यांना सोडणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
याठिकाणी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, मडूरा उपसरपंच बाळू गावडे, कास सरपंच प्रवीण पंडित, प्रकाश वालावलकर, नकुल परब, मोहन गवस, घनशाम वालावलकर, उल्हास वालावलकर, सुधीर नाईक, पिंटो परब, मंदार वालावलकर, पोलीस पाटील नितीन नाईक, कास पोलीस पाटील प्रशांत पंडीत आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
