रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी व भाजपचे ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते मुकुंद फाटक यांचे निधन
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी व भाजपचे ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते मुकुंद वासुदेव फाटक (८२, रा. जामसंडे फाटक क्लास) यांचे शनिवारी रात्री १:३० दीड वा. च्या सुमारास जामसंडे येथील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने उपचारादरम्यान निधन झाले. ‘आबाकाका’ या नावाने ते सुपरिचित होते. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात ते कार्यरत होते. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची विशेष ओळख होती.
मुकुंद फाटक यांनी रिझर्व्ह बँकेत युनियन लीडर म्हणून काम पाहिले होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते देवगड तालुक्यातील विविध संस्थावर कार्यरत राहिले. जामसंडे येथील विद्या विकास मंडळाचे ते सुमारे २० वर्षे कार्यवाह होते. जामसंडे हायस्कूलच्या प्राथमिक विभागाची इमारत त्यांनी स्वखर्चातून उभी केली होती. यासाठी सुमारे दहा लाखाहून अधिक खर्च करण्यात आला होता. देवगड तालुका खरेदी- विक्री संघावरही ते संचालक म्हणून कार्यरत होते. देवगड अर्बन को. ऑप. बँकेचे ते माजी उपाध्यक्ष, तर विद्यमान तज्ज्ञ संचालक होते. जामसंडे येथील बॅ. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मारकाचे ते वहिवाटदार विश्वस्त होते. भाजपचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. देवगड तालुका भाजपचे ते माजी कोषाध्यक्ष होते. देवगड तालुक्यातील पहिले नर्सिंग कॉलेज जामसंडे येथे सुरु करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. विविध शैक्षणिक संस्था, देवस्थान, गरजू व्यक्तींना त्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली. वृद्धापकाळातील प्रकृती अस्वस्थामुळे गेले काही दिवस ते जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. यातच शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास पार्थिवावर जामसंडे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी माजी आमदार ॲड. अजित गोगटे, देवगड अर्बन बँकेचे अध्यक्ष सदाशिव ओगले, भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, उद्योजक नंदकुमार घाटे, देवगड अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष भाई आचरेकर, राजा भुजबळ, राजा वालकर आदी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. मुकुंद फाटक यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
मुकुंद फाटक यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते एक उत्तम मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनामुळे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व हरपल्याची भावना माजी आमदार ॲड. गोगटे यांनी व्यक्त केली.