देवगड / प्रतिनिधी
युवतीच्या हातातील पिशवी अज्ञात चोरट्याने पळवत त्यातील मोबाईल व रोकड केली लंपास ; आचरा मुणगे मार्गावरील घटना
मुणगे तळेवाडी येथील प्रिया रामदास निकम (वय २५) ही कामावरून घरी परतत असताना आचरा- मुणगे रस्त्यावर दुचाकीने आलेल्या एका अनोळखी संशयिताने तिच्या हातातील पिशवी जबरदस्तीने हिसकावून त्यातील ६ हजार रुपये किंमतीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल व ८०० रुपयांची रोकड लंपास केली. संशयिताच्या कृत्याने प्रिया निकम हिने आरडाओरड करताच संशयिताने आपली दुचाकी घटनास्थळीच टाकून पलायन केले. ही घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वा. च्या सुमारास घडली. अज्ञात संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया निकम ही युवती आचरा डोंगरेवाडी येथील सुनील दुखंडे यांच्याकडे कामाला असून ती ९ रोजी सायंकाळी काम आटोपून आचरा- मुणगे रस्त्यावरून पायी घरी परतत होती. याचदरम्यान तेथील घाटीरस्त्यावर एका अनोळखी दुचाकीस्वाराने तिच्या हातातील पिशवी हिसकावली. त्यामुळे प्रिया निकम हिने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे संशयिताने त्याची दुचाकी घटनास्थळीच टाकून प्रिया निकम हिची पिशवी घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. चोरी झालेल्या पिशवीमध्ये सहा हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल व ८०० रुपयांची रोकड होती, असे प्रिया निकम हिने देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी देवगड पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.
