नामस्मरण ही कलियुगातील श्रेष्ठ साधना – हेमंत मणेरीकर कनेडी येथे सनातन संस्थेतर्फे जाहीर प्रवचन
आत्मा हा आनंद स्वरूप आहे. किडा मुंगी पासून प्रगत अशा मानवापर्यंत सर्वजण आनंदाच्या शोधात असतात. माणसाची स्थिती सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वताएवढे अशी स्थिती आहे. सुख मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस पैसा, गाडी वगैरे भौतिक गोष्टींमध्ये भरकटून गेला आहे. मात्र खरे सुख म्हणजे आनंद मिळवण्यासाठी साधना आवश्यक असून सध्याच्या काळात नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री हेमंत मणेरीकर यांनी केले कनेडी येथील समाधी महापुरुष सभागृहात संस्थेच्या वतीने आयोजित आनंदी जीवनासाठी साधना याविषयी जाहीर प्रवचनात ते बोलत होते. रविवारी सायंकाळी हे प्रवचन झाले. यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली. श्री भास्कर काजरेकर यांनी प्रवचन घेण्यामागील उद्देश सांगितला.
श्री. मणेरीकर म्हणाले की, जीवनातील ८० टक्के समस्यांचे कारण आध्यात्मिक आहे. त्यावर साधना करणे हाच उपाय आहे. आपल्याला होणाऱ्या शारीरिक, मानसिक त्रासाच्या मागे अनेकदा आध्यात्मिक कारण असते. ते निवारण करण्यासाठी आध्यात्मिक उपाय करावे लागतात.
धर्मशास्त्रात कर्मफळ सिद्धांत सांगितला गेला आहे. शुभ कर्मामुळे पुण्य आणि अशुभ कर्म केल्याने पाप वाट्याला येते. पाप पुण्याचे फळ सुख दुःखाच्या स्वरूपात भोगावेच लागते. साधनेमुळे प्रारब्ध सुसह्य होते.
श्री. काजरेकर यांनी सांगितले की, सनातन संस्था अध्यात्मप्रसार करणारी असून साधकांना साधनेचे वैयक्तिक मार्गदर्शन करून ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवते. साधना म्हणजे काय आणि योग्य साधना कशी करावी हे सर्वांना कळावे यासाठी संस्थेतर्फे प्रवचने आणि सत्संग घेतली जातात.
यावेळी उभारण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचा जिज्ञासूंनी लाभ घेतला. सूत्रसंचालन क.निना कोळसुलकर हिने केले. प्रवचनाला पंचक्रोशीतील जिज्ञासू उपस्थित होते.