कणकवली दि ११ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
बेंचेस घोटाळा करणाऱ्यांना घरी बसवा – संदेश पारकर यांचे आवाहन
बेंचेस घोटाळा करुन कोट्यवधींचा निधी लाटणाऱ्या आमदार नितेश राणेंना या निवडणुकीत घरी बसवा असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले.
श्री. पारकर यांनी आज पियाळी गावात झंझावाती दौरा केला. यावेळी त्यांनी बेंचेस घोटाळा करून मागासवर्गीयांचा निधी लाटणाऱ्या आमदाराला गावात थारा देऊ नका असे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, सुनील कदम, प्रवीण कदम, संजय बंदरकर, राहुल कदम, विकास कदम, शरद नारकर आदी उपस्थित होते.
श्री. पारकर म्हणाले, केवळ तीन ते चार हजार रूपयांना मिळणारी बेंचेस, राणे यांनी आपल्या ठेकेदारामार्फत १२ हजार रूपयांना घेण्यास समाजकल्याण विभागाला भाग पाडली. एवढेच नव्हे तर समाजकल्याण खात्याच्या निधीमधून आलेल्या या बेंचेसवर आपले नाव टाकले. आम्ही आंदोलन, मोर्चा काढल्यानंतर ही नावे हटविण्यात आली. तर अजूनही काही बेंचेवर राणेंचे नाव आहे. या योजनेत भ्रष्टाचार करून मिळविलेला पैसा राणे आता निवडणुकीत वापरत आहेत. राणेंचे कार्यकर्ते रात्री अपरात्री येऊन पैसे वाटप करत आहेत. मात्र अशा पैसे वाटणाऱ्यांना गावातून पळवून लावायला हवे.
