देवगड/ प्रतिनिधी
आरक्षणाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्ष – अंकुश जाधव
आरक्षणाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्ष आहे. देशातील दुर्बल घटकांना दिलेले आरक्षण संविधानात्मक अधिकार आहे. त्यामुळे आरक्षण संपविण्याची भाषा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करू नये. आरक्षण हे संविधानातच लिहिले आहे. आरक्षण संपविण्याचा प्रयत्न झाल्यास आरक्षणवादी जनता त्यांचे पानिपत करेल अशी टीका भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी केली. तसेच ५ ऑक्टोबर रोजी कणकवली येथे होणा-या आरक्षण बचाव रॅलीत मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
संविधान रॅली यशस्वी करण्यासाठीचे देवगड तालुका नियोजन बैठक जामसंडे येथील भाजपा कार्यालयात पार पडली. यावेळी माजी आमदार ॲड. अजित गोगटे, अनुसूचित जाती जिल्हा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव उपस्थित होते.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अंकुश जाधव म्हणाले, घटनाकारांनी आरक्षणाचा मुद्दा राजघटनेमध्ये समाविष्ट करण्याचा मूळ उद्देश देशात आर्थिक, सामाजिक व राजकीय समानता यावी हा होता. आजही देशातील दुर्बल घटकांना आरक्षणाची गरज आहे. मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत. काँग्रेसने आपल्या सत्ता कालावधीत देशात किती समानता आणली. काँग्रेस पक्ष हा जातीयवादी पक्ष आहे. त्यांनी प्रथम आपले आत्मपरीक्षण करावे. केवळ आरक्षण घेणारे जनतेच्या बाजून आपण आहोत असा दिखावा काँग्रेस करत होते मात्र राजीव गांधी यांच्या मनातले काँग्रेसचे धोरण परदेशात का होईना बाहेर पडले असे मतही अंकुश जाधव यांनी व्यक्त केले.
काँग्रेसने आपल्या सत्ता कालावधीत ओबीसी, धनगर व मराठ्यांना आरक्षण दिले नाही. आरक्षणाचे मारेकरी हा काँग्रेस पक्ष आहे. म्हणून जनतेने त्यांना जागा दाखवली. सत्तेपासून त्यांना दूर ठेवले आहे. अशी टीकाही जाधव यांनी केली आहे.
यावेळी अनुसूचित जाती मोर्चाच्या पडेल मंडळाचे अध्यक्षपदी विश्वनाथ पडेलकर, तर देवगड येथील मंडळाचे अध्यक्षपदी देवदत्त कदम यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष जाधव यांनी दिले. यावेळी पडेल मंडळाचे तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, न. पं. गटनेते शरद ठुकरुल, पडेल सरपंच भूषण पोकळे, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुसकर, प्रियांका साळस्कर, दयानंद पाटील, योगेश चांदोसकर, माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, वैभव करंगुटकर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
