देवगड २४ सप्टेंबर
नांदेडच्या तरुणांनी काढली देवगडात मद्यधुंद अवस्थेत कॉलेज युवतीची छेड ; ग्रामस्थांचा प्रसाद मिळताच त्यातील दोघे निघाले वाहतूक पोलीस !
देवगडमध्ये फिरण्यासाठी आलेल्या नांदेड मधील युवकांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने कॉलेजमधून घरी जाणाऱ्या कॉलेज युवतीची छेडछाड केली मात्र ती अंगलट आल्यावर बाजारपेठेतील नागरिकांकडून त्यांची येथेच्छ धुलाई करून त्यांची वरात पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. यातील दोन युवक तावडीत सापडले मात्र चौघेजण प्रसार झाले ही घटना मंगळवारी सायंकाळी पाहुणेसहा वा सुमारास देवगड बाजारपेठ मार्गावर घडली. देवगड पोलीस स्टेशनमध्ये आणलेल्या दोन युवकांनी पोलीस स्टेशनमध्ये ही धिंगाणा घातला त्यांना विचारणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरच त्यांनी हात उचलला.
यावेळी पोलिसांनीही उत्तरादाखल त्यांचा चांगला चोप काढला. या घटनेतील तिसरा युवक पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला व त्यांनी वसई वाहतूक शाखेत दोघेजण कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना सांगतात. पोलिसांच्या भुवया उंचावल्या या घटनेत पोलीस दलातील दोघेजण असल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली आहे. भर बाजारपेठेत एका युवतीची छेडछाड करणाऱ्या युवकांमध्ये पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आल्याने नागरिकांनी पोलिसांनाही चांगलेच फैलावर घेतले असून देवगड पोलीस याबाबत काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान यातील उर्वरित तिघांनाही सायंकाळी उशिरा नागरिकांनी सातपायरी येथे पकडून यथेच्छ चोप दिला व त्यांची धिंड काढत देवगड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या सर्वांना देवगड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
नांदेड मधील सात तरुण गाडी करून देवगडमध्ये मंगळवारी फिरण्यासाठी आले होते सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ते आनंदवाडीकडे जात होते. त्याच दरम्यान कॉलेजहून बाजारपेठेत जात असलेल्या कॉलेज युवतीला त्यानी आनंदवाडीकडे जाण्याचा मार्ग विचारला .त्यावेळी तिने तो मार्ग दाखविला मात्र ते तिला गाडीत बसण्यास सांगत होते यावेळी तिने नकार दिला. मात्र मद्यधुंदस्थितीत असलेल्या तरुणांनी तिची छेडछाड करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने घाबरून बाजारपेठेच्या दिशेने धाव घेतली हा प्रकार बाजारपेठेतील ग्रामस्थांच्या लक्षात येतात त्यांनी त्या तरुणांना पकडून धुलाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान दोघेजण सापडले उर्वरित पाच जन पसार झाले त्या दोघांचीही वरात देवगड पोलीस स्टेशनमध्ये काढण्यात आली. यावेळी पोलीस हवालदार उदय शिरगावकर, पो. हे .कॉ. प्रसाद आचरेकर, निलेश पाटील यांनी विचारणा केली असता पोलिसांसमोरच धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.
यावेळी पोलिसांनी पोलीसी हीसका दाखविण्यास सुरुवात केल्यानंतर ते पोलिसांवरच उलटले. यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर त्यांनी हात उचलला मात्र पोलिसांनी त्यांना चांगला चोप दिला आहे. दरम्यान ती युवती व तिचे पालक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. यावेळी तिसरा युवकही देवगड पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला त्यांनी आम्ही दोघेजण वसई मध्ये पोलीस वाहतूक शाखेत कार्यरत असल्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सांगितले.
त्यामुळे या घटनेत दोन पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. यातील पळून गेलेल्या उर्वरित तीन जणांना ग्रामस्थांनी सातपायरी येथे असल्याचे समजतात तिथे जाऊन चांगला चोप दिला पोलिसांच्या स्वाधीन केले. या सर्वांची मेडिकल तपासणीसाठी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे मात्र वैद्यकीय तपासणी अंतिम स्पष्ट होणार दरम्यान याबाबतची पोलिसांची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
