कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली भ्रष्टाचार मुक्त करण्याचा नारा देत शहर विकासाच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायतमध्ये सत्तेवर आलेले सहा महिने पूर्ण होऊनही स्वतःच्या हिंमतीवर एक रुपयाचा विकासनिधी आणू शकलेले नाहीत. उलट विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचाराला त्यांनी प्रारंभ केला आहे.कणकवली शहर पूरक नळयोजनेसाठी यापूर्वीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून डीपीआर व सर्व्हे झाला असताना सत्ताधाऱ्यांनी या नळ योजनेचे ५० कोटी पर्यंत अंदाजपत्रक वाढवण्यासाठी पुन्हा एकदा डीपीआर व सर्व्हेची निविदा काढली आहे. हा प्रकार पैसे गिळंकृत करण्यासाठीच असल्याचा आरोप करत आपला त्याला विरोध असल्याचे भाजपचे नगरसेवक बंडू हर्णे व इतर नगरसेवकांनी सांगितले.
कणकवली येथील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण उपस्थित होत्या.यावेळी बंडू हर्णे म्हणाले, आम्ही यापूर्वीच चांगल्या कामाला पाठींबा देऊ पण चुकीचे काम करू देणार नाही असे जाहीर केले आहे. कणकवली नगरपंचायतमधील सत्ताधारी भ्रष्टाचाराचा श्रीगणेशा कसा करत आहेत हे आम्ही जनतेसमोर आणत आहोत. कणकवली नगरपंचायतने पुरक नळपाणी योजना व भुयारी गटार योजनेसाठी निविदा काढली आहे.
भुयारी गटार योजनेपूर्वी शहराची पाणी पुरवठा योजना प्रतिमाणसी प्रतिदिन १३५ लिटर प्रमाणे होणे आवश्यक आहे. ती झाल्यानंतर शासनाच्या निकषाप्रमाणे भुयारी गटार योजना आणता येते. त्याची पूर्व तयारी म्हणून कणकवली नगरपंचायतने फेब्रुवारी २०१७ मध्ये ठराव घेतला होता. तसेच शासनाची नियुक्त तज्ञ एजंन्सी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला डीपीआर व सर्व्हेसाठी आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जीवन प्राधिकरणे कणकवली नळ योजनेचा सखोल सर्व्हे करुन डिपीआर तयार करत अंदाजपत्रकही केले होते. अंतिम तांत्रिक मान्यतेसाठी मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण ठाणे,पनवेल येथे पाठवले होते. अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता घेऊन निधीच्या उपलब्धतेनुसार हे काम सुरू करायचे आहे.
या कामाचे सुमारे २२ कोटीचे अंदाजपत्रक आहे. त्याच्या ५ टक्के नुसार ११ लाख रुपये नगरपंचायत जीवन प्राधिकरणला देणे आहे, त्यातील ५ लाख रुपये नगरपंचायतने ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत. असे असताना देखील या पूरक नळ योजनेचे अंदाजपत्रक सत्ताधाऱ्यांना ५० कोटीच्यावर न्यायचे आहे. मात्र ते जीवन प्राधीकरण करणार नाही म्हणून डीपीआर व सर्व्हेचे काम झालेले असतानाही सत्ताधाऱ्यांनी भुयारी गटार योजनेबरोबरच पूरक नळ योजना कामाच्याही डीपीआरसाठी नवीन एजन्सी नेमण्याबाबत निविदा काढली आहे. या कामासाठी नगरपंचायतीने यापूर्वी खर्च केला असतानाही सत्ताधाऱ्यांमुळे निधीचा अपव्यय होणार आहे. अद्याप ही निविदा उघडलेली नाही.मात्र, असे असतानाही सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या चुकीच्या कामाबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.
बंडू हर्णे म्हणाले, कणकवलीचा विकास व्हावा आणि प्रश्न सुटावेत यासाठी कणकवलीकरांनी संदेश पारकर यांना नगराध्यक्षपदी बसवले आहे. परंतु नगराध्यक्षांना त्याचा विसर पडला आहे. आठवड्यातून एक दोन दिवस ते नगरपंचायत मध्ये असता. जास्त दिवस ते मुंबईला असतात. भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांचे प्रवेशासाठी ते उंबरठे झिजवत आहेत. ते महामंडळ, विधान परिषदेची मागणी करत आहेत. त्यांना जनतेने कणकवलीच्या विकासासाठी बसवले आहे स्वतःच्या विकासासाठी नाही. हे आता कणकवलीकरांच्या लक्षात येत असल्याची टीकाही बंडू हर्णे यांनी यावेळी केली.
फोटो ओळ – कणकवली येथे नगरसेवक बंडू हर्णे यांनी आपली भूमिका मांडली.यावेळी नगरसेवक संजय कामतेकर,मेघा गांगण उपस्थित होत्या.
