कणकवली (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उमेद फाउंडेशनच्या वतीने माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ३८ विद्यार्थ्यांना सुमारे दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
उमेद फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन स्वरूपात माहिती मागविण्यात आली होती. विद्यार्थ्यांची शैक्षणिक जिद्द, आर्थिक गरज तसेच प्रतिकूल परिस्थिती या निकषांच्या आधारे निवड प्रक्रिया पार पाडून पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, उमेद फाउंडेशनकडून हे शिष्यवृत्ती वाटप सलग पाचव्या वर्षी करण्यात आले असून अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला यामुळे भक्कम आधार मिळत आहे.
कासार्डे विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सौ.बिसुरे होत्या. यावेळी उमेद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गाताडे, संस्थापक सदस्य प्रदीप नाळे, संस्थेचे सदस्य रविंद्र पाताडे, पर्यवेक्षक श्री. राणे, उमेदीयन सत्यवान केसरकर, उमेदीयन विजय मसुरकर, सागर पेंडूरकर, राजेंद्र पाटील, जे. बी. पाटील, नितीन पाटील, विनायक पाताडे, पत्रकार गुरुप्रसाद सावंत, जाकीर शेख तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत शिक्षणाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी, सूत्रसंचालन जाकीर शेख आणि नितीन पाटील यांनी तर आभार जे. बी. पाटील यांनी मानले. गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे खंडित होऊ नये, या उद्देशाने उमेद फाउंडेशन सातत्याने कार्यरत असून या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी उमेद मिळत आहे.
