कणकवली येथे मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव ३ फेब्रुवारी पासून ! ; वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन

 

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

 

कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ३३ वा मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव ३ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित केला आहे. रंगभुमीवरील दिग्गज कलाकारांची उपस्थिती या नाट्य महोत्सवाला लाभणार आहे.

 

आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था कणकवली सारख्या छोटयाशा निमशहरी भागात गेली ४८ वर्षे नाथ पै एकांकिका स्पर्धा, ३२ वर्ष मच्छिंद्र कांबळी स्मृती नाटय उत्सव व २६ वर्ष पं. जितेंद्र अभिषेकी त्रिसूत्री शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करित आहे. यावर्षी मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी स्मृती नाटय महोत्सवाचे ३३ वे वर्ष आहे. आचरेकर प्रतिष्ठान भारतीय रंगभूमीवरील प्रायोगिक नाटकांचा नाटयउत्सव आयोजित करत असते.

 

या कालावधीत भारतातील प्रमुख रंगकर्मींनी या महोत्सवात आपले नाट्यप्रयोग सादर केले आहेत. गिरीश कर्नाड, अमोल पालेकर, नसरुद्दीन शहा, रत्ना पाठक, विनोद पावा, हविथ तन्वीर, रोहिणी हट्टगंडी, डॉ. श्रीराम लागू, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर, सुलभा देशपांडे, अतुल पेठे, डॉ. मोहन आगाशे, ते आजच्या आघाडीचे अमृता सुभाष, मुक्ता बर्वे, संदेश कुलकर्णी, दत्ता पाटील, आशुतोष पोतदार, प्राजक्त देशमुख अशा अनेक लेखक, कलाकार, दिग्दर्शक यांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे.

 

या वर्षी आजचे आघाडीचे नाट्यकर्मी सुप्रसिद्ध नाट्य अभिनेता गिरीश कुलकर्णी, उमेश जगताप, ओंकार गोवर्धन, गीतांजली कुलकर्णी, पर्ण पेठे, योगेश्वर वेद्रे, कल्पेश समेळ, अजित साबळे कणकवलीच्या नाट्य उत्सवात आपले नाटयप्रयोग सादर करणार आहेत. तसेच आघाडीचे लेखक हर्षवर्धन ओत्री, दत्ता पाटील, प्रा.प्रविण भोळे, अजित साबळे यांच्या नाट्य कलाकृती सादर करणार आहेत.

३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांचे “होल बॉडी मसाज”, ४ फेब्रुवारी रोजी आविष्कार मुंबई यांचे “गोळकोंडा डायमंड्स”, ५ फेब्रुवारी रोजी सोशल मंच व टाचनी टेल्स थिएटर “तुझी औकात काये”, ६ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ललित कला केंद्र, नाशिकचे “इथेच टाका तंबू “, ७ फेब्रुवारी रोजी शून्य पुणे “पोकळ बासा” , ८ फेब्रुवारी रोजी ललित कला केंद्र पुणे यांचे “लेखा जोखा”, ९ फेब्रुवारी रोजी भद्रकाली प्रोडक्शन्स, मुंबईचे रंगभूमीवर गाजत असलेला “करुणाष्टके” या नाटयप्रयोगाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.

या महोत्सवास नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने कार्याध्यक्ष अॅड. एन.आर. देसाई व कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *