कणकवली (प्रतिनिधी)
चॉइस कॉलेज ऑफ आर्टस् ॲन्ड कॉमर्स, पुणे आणि फाऊंडेशन फॉर एज्युकेशन ॲन्ड कम्युनिटी वेल्फेअर, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा मानाचा ‘राज्यस्तरीय ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०२६’ तळेरे – कणकवली येथील सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना संशोधक – वैज्ञानिक – विचारवंत डॉ. प्रकाश खंडागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
चॉईस कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, वारजे, पुणे आणि फाउंडेशन फॉर एज्युकेशन अँड कम्युनिटी वेल्फेअर, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने “विकसित भारत – पारंपरिक ज्ञान आणि शाश्वत विकास : शिक्षकांची भूमिका” राज्यस्तरीय परिसंवाद व शिक्षक गौरव समारंभ – २०२६ यशस्वीपणे पार पडला. हा कार्यक्रम पदमजी हॉल, टिळक रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
या परिसंवादात पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून आजच्या सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन संशोधक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद खंडागळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले. भारतीय परंपरा, मूल्यव्यवस्था व आधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
या वेळी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवावी, वाचन ही विचारक्षम समाजनिर्मितीची गुरुकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले. तसेच स्त्री सक्षमीकरण व सामाजिक परिवर्तनात शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आफताब अन्वर शेख, प्राचार्य, चॉईस कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, वारजे, पुणे होते. त्यांनी परिसंवादाची संकल्पना स्पष्ट करताना शिक्षकांचे योगदान राष्ट्रउभारणीत किती महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमात ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार – २०२६, जीवन गौरव पुरस्कार – २०२६, युवा गौरव पुरस्कार – २०२६, उत्कृष्ट शाळा पुरस्कार तसेच इतर अनेक मानाचे पुरस्कार देऊन शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, शाळा व व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात कॅम्प एज्युकेशन – सायरस पूनावाला शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली, ज्यामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत लाभली.
श्री. युवराज हरिदास ताटे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री. विलास लोंढे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे, आयोजकांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
