बळीराजासाठी एक दिवस बांधावरची शाळा ; गुरुपौर्णिमेच्या दिवशी जिल्हा परिषद कातवणेश्वर शाळेचा आगळावेगळा उपक्रम

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (स्वप्नील लोके)

बळीराजासाठी एक दिवस बांधावरची शाळा ; गुरुपौर्णिमेच्या दिवशी जिल्हा परिषद कातवणेश्वर शाळेचा आगळावेगळा उपक्रम

      गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी जिल्हा परिषद कातवणेश्वर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी “एक दिवस बळीराजासाठी” हा नाविन्यपूर्ण आणि अनुभवात्मक उपक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीत नेऊन भात बी पेरणी, भात काढणी, भात लावणी ,मातीचा अनुभव घेणे अशा उपक्रमांत सहभागी करून घेण्यात आले.

जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडून जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आत्मीयता निर्माण व्हावी, मातीतल्या श्रमांची जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

 

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून, आजचा दिवस “पुस्तकाबाहेरील ज्ञान” देण्याचा संकल्प घेऊन निवडला असल्याचे शिक्षक धर्मराज धुरत सर यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी भावनिक आठवणी शेअर केल्या.

“माझ्या डी.एड. प्रशिक्षणाच्या काळात गुरुपौर्णिमेला वेगळं काही तरी अनुभवायला मिळावं, हे आमचे गुरुवर्य प्रि. आर. आर. लोके सर यांचीच शिकवण होती. आज मी शिक्षक म्हणून या चिमुकल्यांना त्याच शिकवणीचा अनुभव देतो आहे. एक काळ होता, जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांच्या भूमिकेत होतो; आज मात्र मी गुरू म्हणून उभा आहे, ही बाब माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.”

 

धुरत सर पुढे म्हणाले, “आमचे आदरणीय प्रि. आर. आर. लोके सर, ज्यांनी शिक्षक घडविण्याची अद्वितीय प्रक्रिया अमलात आणली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले असंख्य विद्यार्थी आज संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनापासून आमचे गुरू लोकेसाहेबांना शतशः मानवंदना!”

कार्यक्रमावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली ढोके, आकांक्षा कासले, सहाय्यक शिक्षक सोमनाथ माने हेमंत पराडकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर जोईल , वैभव आईर सत्यवान आईर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्साह, शेतीतील रममाण होणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरची समाधानाची झळक ही या उपक्रमाची यशोगाथा सांगत होती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *