निगुडेत पोटकालव्याची माती मुख्य कालव्यात टाकल्याने पाणीपुरवठा ठप्प ; ठेकेदार कंपनीचा प्रताप : संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडले

0 minutes, 0 seconds Read

 

बांदा (प्रतिनिधी)

निगुडेत पोटकालव्याची माती मुख्य कालव्यात टाकल्याने पाणीपुरवठा ठप्प ; ठेकेदार कंपनीचा प्रताप : संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडले

पाण्याअभावी बागायतीसह नगदी पिके करपली

    निगुडे आरोसकर टेंब येथे तिलारी पोट कालव्याचे काम गेले चार महिने कासव गतीने सुरू आहे. ठेकेदाराने पोट कालव्यासाठी खोदलेली माती मुख्य कालव्यात टाकल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तिलारी कालव्याचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने रोणापाल, मडुरा भागातील बागायतीसह नगदी पिके पाण्याअभावी करपून चालली आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी निगुडे येथे ठेकेदाराच्या सुपरवायझरला जाब विचारला. येत्या तीन दिवसात तिलारी मुख्य कालव्यातील माती काढण्यास ठेकेदाराने असमर्थता दर्शवली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी काम बंद पाडण्याचा निर्णय घेतला.

निगुडे येथून कास गावाकडे जाणारी पोटकालव्याची पाईपलाईन टाकण्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. या कामी ठेकेदाराचा सावळा गोंधळ सुरू आहे. पोट कालव्यासाठी खोदलेली माती मुख्य कालव्यात टाकण्यात आली आहे. त्यामुळे रोणापाल, मडुरा गावाकडे जाणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. कालव्याच्या पाण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी माड, पोफळी बागायतीसह मिरची, चवळी, नाचणी, भुईमूग अशी नगदी पिके केली आहेत. मात्र, सध्या नदीतील पाणी आटल्याने सिंचनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्याअभावी नगदी पिके करपून चालली आहेत.

रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी ७ फेब्रुवारी रोजी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पुढील आठ दिवसात मुख्य कालव्यातील माती काढण्याचे आश्वासन तिलारी कार्यकारी अभियंता यांनी दिले होते. सदर मुदत संपून आणखी बारा दिवसांचा कालावधी लोटला तरीही काम जैसे थे सुरू आहे. तिलारी कल मुख्य कालव्यातील माती तशीच कालव्यात पडून आहे.

त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी निगुडे येथे ठेकेदार कंपनीला जाब विचारला. कालवा विभागाचे अभियंता मोहिते यांनीही मोबाईलवर बोलताना आपली जबाबदारी झटकली. मंगळवार सकाळ पर्यंत मुख्य कालव्यातील माती काढण्याची मुदत ग्रामस्थांनी ठेकेदाराला दिली. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे सदर काम रोखण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तिलारी विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांची मिलीभगत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

यावेळी माजी सरपंच सुरेश गावडे, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, माजी सदस्य प्रकाश वालावलकर, सोसायटी संचालक यशवंत कुबल, विष्णू सावंत, अरुण पंडित, मोहन गवस, विजय परब, रामा परब, सोमनाथ तोरस्कर, मंदार परब, सागर गोठस्कर, पारदेश परब, अर्जुन देऊलकर, पेद्रू डिसोजा, तात्या शेर्लेकर, उल्हास वालावलकर, शुभम नाईक, अरुण मसुरकर, विजय चौकेकर, बाळू देऊलकर आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *