श्रद्धा आणि भक्तीच्या भक्तिरसात गुंतली स्वामी भक्ताची नाळ ; २५ वर्षे अविरत स्वामी सेवेची
मिठबाव, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी पादुका प्ररिकमा २५ वा वर्धापनदिन विशेष
स्वामीभक्त उमेश सोमण आणि त्यांच्या संकल्पाने बदललेला मिठबावचा इतिहास
२५ वर्षांपूर्वी, मिठबावमध्ये एक विशेष घटना घडली, जी आजही त्या परिसरात एक श्रद्धेचे प्रतीक बनून उभी आहे. देवगड एसटीच्या आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले स्वामीभक्त उमेश सोमण यांनी अक्कलकोट देवगड असा एसटी बस आपली सेवा बजावत असताना अक्कलकोट मध्ये स्वामी माऊलींच्या चरण स्पर्शाने एक महत्त्वाचा संकल्प करत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांची पहिली पालखी मिठबावला आणण्याचा निर्धार केला. त्यानुसार फेब्रुवारी २००० साली श्री स्वामी समर्थ माऊलींच्या पालखीचे आगमन मिठबाव मध्ये झाले. यांच्या मनातील हे स्वप्न आणि संकल्प त्यावेळी अनेकांच्या जीवनात एक नवा चैतन्य संचार करणारे ठरले. स्वामी भक्त उमेश सोमण यांच्या घरात २५ वर्षांपूर्वी स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांची पालखी आली. त्या काळात यासाठी जे आत्मविश्वास आणि भक्तिरस होता, तो अनोखा होता.या पालखीच्या आगमनाने देवगड व मिठबाव परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होऊन एक नवा उत्साह पसरला.
२००० साली प्रथम मिठबाव येथे पालखी सुरू झाली.त्यानंतर, या पालखीला समर्थन मिळवून देण्यासाठी विजय काळे, अजित राणे,विश्वनाथ गोगटे,विनय खाडीलकर अशी चार-पाच वर्षे या स्वामीभक्तांच्या घरी पालखी आणली जात होती.यामध्ये, प्रत्येक स्वामीभक्त आपल्या घरात पालखी येणार या उत्साहाने सहभागी झाला. माऊलींच्या येण्याने येथील श्रद्धाळू वातावरणात एकात्मता निर्माण झाली. मिठबावच्या लोकांनी यामध्ये आपली भूमिका अत्यंत पवित्र समजली. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेनं त्यांच्या जीवनात चांगले परिवर्तन घडवून आणले.
रघुनाथ काळे यांचे योगदान
स्वामीभक्तांच्या अखंड निष्ठेची आणि प्रेमाची दखल घेत, रघुनाथ काळे यांनी ४०० स्क्वेअर फुट स्वतःच्या मालकीची जमीन श्री स्वामी समर्थ माऊलींच्या कार्यासाठी देऊन एक अनोखी भूमिका पार केली. त्यांनी केलेल्या या दातृत्वामुळेच स्वामी भक्तांनी एकत्र येईल श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाची स्थापना केली. कालांतराने या भूमीवर, स्वामीभक्तानी पुढे केलेल्या मदतीच्या अनेक हातांमधून बालकांसाठी एक सुसज्ज असे बालोद्यान उभे करण्यात आले. त्यातच एक स्वामींच्या आसनाची जागा ठरविण्यात आली.त्यातूनच पुढे उदय झाला तो स्वामींच्या तैलचित्र निर्मितीचा. स्वामी भक्तांनी केलेला संकल्प सिद्धीस नेण्याचे बळ दिले तेही स्वामीनीचं.
श्रीकृष्णाच्या वेलीतून बहरलेल्या नंदकुमाराने दिला तैलचित्राला सुबक आकार,सुधाकराने लाकडी नक्षीकलेने चढविला त्यावर साज. स्वामी भक्तांच्या मेहनतीचे चीज झाले आणि स्वामींच्या स्थानाला मूर्तिमंत स्वरूप आले. दत्तगुरु नीच एकनाथ षष्ठीचा दिवस निवडला आणि श्रीपादाकडे भक्तांनी उभारलेले स्वामी सेवेचे दालन खुले करण्याची जबाबदारी दिली. स्वामी दालन भाविकांसाठी उघडले त्यानंतर जो स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवला तो गगनात ही मावणारा नव्हता.२००० सालापासून सुरू झालेला श्री स्वामी समर्थ माऊलीच्या पादुका पालखीचा प्रवास २००६ सालापासून हक्काच्या जागेत स्थिरावला तो कायमचा. १३ फेब्रुवारी २००८ साली या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका मंडळाच्या वतीने बसविण्यात आल्या.त्यातून एक समर्पित स्थान तयार झाले, जे आज श्री स्वामी समर्थ मठ म्हणून ओळखले जाते.
देशावर असलेल्या कोरोना सारख्या महामारीनंतर एक वेगळी दिशा स्वामींनी आपल्या भक्तांना दाखवली. आणि त्यातून बालोद्यानाच्या मठांमध्ये रूपांतर होऊ लागले भव्य सभा मंडप आकार घेऊ लागले. आणि खऱ्या अर्थाने बालोद्यांनाला श्री स्वामी समर्थ मठाचे स्वरूप आले. हे सर्व काही घडले ते स्वामी भक्तांनी दिलेल्या दातृत्वातूनच. श्री स्वामी समर्थ मठ हे मिठबावच्या परिसरात एक महत्त्वाचे धार्मिक व सामाजिक केंद्र बनले आहे. येथे स्वामी समर्थ महाराज यांच्या उपदेशाचा प्रभाव सर्व वयोगटांमध्ये जातो आणि श्रद्धा व भक्तीची एक नवी लाट यामुळे निर्माण झाली आहे.
२५ वर्षांपूर्वी झालेली स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांची पहिली पालखी ही केवळ एक ऐतिहासिक घटना नव्हती, तर ती एक व्रत, एक श्रद्धा आणि एक स्थिर आध्यात्मिक समारंभ बनली आहे. यावर्षीचा २५ वा वर्धापन दिन याचे महत्त्व आणखी दुप्पट करतो.श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांची पालखी प्रत्येक भक्ताच्या जीवनातील एक अतूट भाग बनली आहे, आणि त्यांच्या आशीर्वादाने एक नवीन आध्यात्मिक तेज आणि समृद्धीचा प्रकाश पसरत आहे.प्रत्येक भक्ताचा मनोभाव आणि साधना यामध्ये एक नवीन धारा निर्माण होते, आणि यापुढेही हे पालखीचे आगमन असेच भक्ती, समर्पण आणि आध्यात्मिकतेचा संदेश पसरवत राहील.
“जीव हा तुझ्या सेवेसी अर्पिला समर्था तूच माझा मायबाप तूच एक कर्ता या गीताच्या उक्तीप्रमाणे” मिठबाव पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त गुण्यागोविंदाने मोठ्या आनंदात मिळेल ती सेवा देत स्वामी सेवेचे कार्य करत आपली जबाबदारी निर्विघ्नपणे पार पाडताना दिसतात. म्हणूनचं अभिमानाने सांगवस वाटत,स्वामी म्हणतात, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्रिवार सत्य आहे. स्वामीनी दिलेल्या या नवचैतन्यामुळेचं आज २५ वर्षाचा प्रवास यशस्वी होऊ शकला.
स्वप्निल लोके , उपसंपादक महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल .

