पुण्यातील राष्ट्रीय परिषदेत शिरगाव येथील कातळशिल्पा विषयीचा रिसर्च पेपर सादर

0 minutes, 2 seconds Read

 

देवगड (प्रतिनीधी)

पुण्यातील राष्ट्रीय परिषदेत शिरगाव येथील कातळशिल्पा विषयीचा रिसर्च पेपर सादर

दोन वर्षांपुर्वी देवगड तालुक्यातील साळशी येथे उभ्या लँटराईट जातीच्या दगडावरील काही जंगली प्राण्यांची कातळचित्रे इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधकांना सापडली होती. तेथून परतत असताना संध्याकाळच्या अंधारात शिरगाव येथील वाघबावली नावाच्या ठिकाणी एक नवे कातळशिल्प सापडले होते. त्या विषयीचा आपला रिसर्च पेपर पुरातत्व अभ्यासक श्री.रणजित हिर्लेकर यांनी भारतीय-मूर्तीशास्त्र आणि स्थापत्य संशोधन परिषदेच्या पाचव्या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला. श्री. हिर्लेकर 2010 पासून कातळशिल्प विषयात संशोधन करीत आहेत. खरंतर मूर्ती आणि मंदिर स्थापत्य हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. त्याच विषयात त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.कुणकेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग किल्ला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असणाऱ्या कविराज भूषणाने लिहीलेला शिवभूषण याविषयीची त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. गेली पाच सहा वर्षे देवगड इतिहास संशोधन मंडळाची स्थापना करून, देवगड तालुक्यातील प्रत्येक गावातील कातळशिल्प उजेडात करण्याचे काम त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चालवले आहे.

 

 

शिरगाव येथील या डोंगर उतारावरील हे कातळशिल्प वैशिष्ट्यपूर्ण असून हे ११ फुट त्रिज्येचे २२ फुट व्यास असणारे पूर्ण वर्तुळ कोरलेले आहे. त्याच्या एका बाजुला बाहेर दोन फुटाचे एक टोक काढले आहे. चेन मधील लॉकेट प्रमाणे दिसणाऱ्या या वर्तळाकृतीच्या आत दोन वाघ पाठीला पाठ लावून कोरले आहेत. या दोन्ही वाघांच्या डोक्या पासुन सुरु झालेल्या बाह्याकृती दोन्ही रेषा दोन्ही वाघांच्या शेपट्यां पर्यंत एकमेकांना समांतर असून त्या वर्तुळाला मुद्दाम केलेल्या कोनात आणुन एकमेकांना जोडलेल्या आहेत. दोन्ही वाघाचे दोन्ही पाय हे प्रमाणापेक्षा थोडे जाडच आहेत. त्यामुळे ते हत्तीच्या पायां सारखे वाटतात. पण ते पुढील दोन पाय व मागील दोन असे पाय दाखविण्याचा प्रयत्न केल्यामुळे, ते जाड दिसत असावेत. तोंडाचा भाग हा स्पष्टपणे वाघाचा जबड्याप्रमाणे दिसतो. ही संपुर्ण आकृती प्रमाणबद्ध रीतीने कोरलेली आहे.

 

 

पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र व स्थापत्य संशोधन परिषदेचे दोन दिवसीय पाचवे राष्ट्रीय अधिवेशन दि. १० व ११ रोजी झाले. या परिषदेला देशभरातील अनेक राज्यांमधील संशोधकांनी आपले शोध निबंध सादर केले. त्यामध्ये पुरातत्व अभ्यासक श्री. रणजित हिर्लेकर यांनी आपला शोधनिबंध सादर केला. त्यावेळी सत्र प्रमुख म्हणून आर. एच. कुलकर्णी व डेक्कन कॉलेजचे डॉ. श्रीकांत गणवीर हे उपस्थित होते. या आपल्या संशोधन लेखात श्री रणजीत हिर्लेकर यांनी पुढील काही महत्वाचे मुद्दे मांडले.

हे कातळशिल्प समतल करण्यासाठी कलाकाराने कोणते साधन वापरले असेल. कसल्याही लोखंडी हत्यारा विना असे अचूक कोरीव काम करणे अवघड आहे. हे चित्र काढण्यासाठी माणसाला भूमितीची व गणितीय ज्ञानाची आवश्यकता आहे? त्या विना अशी भौमितिक चित्र कोरणे कसे शक्य व्हावे.

असे अनेक प्रश्न उपस्थित करीत श्री. रणजित हिर्लेकर यांनी आपले निष्कर्ष या वेळी मांडले. त्यांच्या मते शिरगाव येथील या कातळशिल्पाचा कर्ता चांगलाच प्रगत मानव असला पाहीजे. हे कातळशिल्प द्विमीतीय चित्रकलेकडुन त्रिमितीय शिल्पकलेच्या दिशेने मानवाचा सुरु असलेला प्रवास अधोरेखीत करते. अशा तऱ्हेचे वर्तुळ कोरण्यासाठी कलाकाराला भुमीतीय गणिताचे ज्ञान आवश्यक आहे. अंक गणिताची ही माहीती असायला हवी. मोजपट्टी वापरण्याचे ज्ञान आवश्यक आहे. अन्यथा इतके मोठे चित्र कोणत्याही साधना विना, गणिता विना काढणे अशक्य आहे. वाघाच्या आकारा विषयीचे शरीरशास्त्रीय ज्ञान हवे. हे ज्ञान मिळविण्यासाठी तत्कालिन मानवाला आवश्यक ती स्थिरता व संमृद्ध जिवन उपलब्ध असणे आवश्यक आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन रात्रीच्या वेळी भिम बेटका सारखी चित्रे काढणे शक्य होईल. पण अशी हजारो कातळचित्रे उघड्यावर आणि तिही इतकी मोठ्या आकाराची आणि अशा कठीण कातळात कोरणे हे रोजची पोटापाण्याच्या चिंतेतुन मुक्त झाल्या शिवाय कसे शक्य व्हावे. बरं हा कातळचित्र कलाकार केवळ आपल्याला दिसणाऱ्या वन्य प्राण्यांचीच चित्रे काढीत नाही.

तर तो आपल्या कल्पनेने मानवाकृतींना वेगवेगळे आकार देऊन त्या मानवाकृतीच्या अमानवीय शक्तीचे दर्शन या कातळचित्रातुन दिसेल असाही प्रयत्न करताना दिसतो. तसेच अनेक भुमितीय आकार त्याने कातळचित्रातुन कोरुन काढले आहेत. ते पहाता त्याच्या भुमिती विषयाच्या ज्ञानाचे आपणास स्पष्ट दर्शन आपणास घडते. आपल्या आसपास दिसऱ्या प्राण्यांची चित्रे कोरण्या पुरती या मानवाची बुद्धीमत्ता सिमित नसुन स्वतंत्र विचार करुन एका आकृतीतुन नव्या आकृती स्वयंप्रेरणेने निर्माण करण्याची प्रगत क्षमता या कातळशिल्प कोरणाऱ्या मानवात असल्याचे दिसुन येते. शिवाय “असे कठिण कातळात इतके अचुक व रेखीव कोरीवकाम लोखंडी हत्यारां वाचुन दगडी हत्यारांनी करणे शक्य नाही.” या अधिवेशनात श्री. आदित्य फडके व प्रा. अरविंद सोनटक्के यांच्या “सुरसुंदरी देवांगना की नायिका”, या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. देशभरातील विविध राज्यातुन आलेल्या मूर्ती व स्थापत्य कलेतील मान्यवरांनी या कार्यक्रमाला शोभा आणली.या अधिवेशनातील इतिहास अभ्यासकांची पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर महादेव मंदिराचा इभ्यास दौऱ्याने या परीषदेची सांगता झाली.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *