युनेस्कोच्या यादीतील बारा किल्ले धावत जाण्याचा युवतीचा निर्धार; आस्मा कुरणे हिचे देवगडवासियांकडून उस्फूर्त स्वागत

देवगड (प्रतिनिधी)

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर ते रायगड असे तब्बल ३०० किलोमीटर अंतर धावत पार करणाऱ्या कोल्हापूरच्या रणरागिणी धावपटू आस्मा कुरणे हिचे देवगड येथे सोमवारी उस्फूर्त स्वागत करण्यात आले. देवगड तालुका व्यापारी संस्था तसेच देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला.

 

कोल्हापूरची रणरागिणी आस्मा कुरणे हिचा हा प्रेरणादायी प्रवास कोल्हापूर सातारा रायगड या तीन जिल्ह्यांतून होणार आहे. १ जून रोजी तिने कोल्हापूर येथून आपल्या धावण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. पहिल्या दिवशी तिने कोल्हापूर ते कराड हे ७५ किलोमीटर अंतर धावत पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी कराड ते सातारा हे ५० किलोमीटर अंतर धावून तिने आपली पुढील वाटचाल सुरू ठेवली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ला येथे भेट देऊन सागरी महामार्ग मार्गे ती देवगड येथे पोहोचली.

 

देवगड येथे पोहोचताच देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था, देवगड पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस प्रवीण सावंत तसेच विविध सामाजिक व व्यापारी संस्थांच्या वतीने तिचे जंगी व उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

 

शिवरायांच्या पराक्रमाला मानवंदना देत युनेस्कोच्या यादीतील बारा किल्ल्यांपर्यंत धावत जाण्याचा तिचा निर्धार उपस्थितांना प्रेरणादायी वाटला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा कार्यवाह नितीन वाळके, देवगड तालुका अध्यक्ष शैलेश कदम, तालुका महिला अध्यक्ष प्रियांका साळसकर, व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आस्मा कुरणे हिचे देवगड येथे स्वागत करून तिच्या पुढील धावण्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

तसेच देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांनी देवगड पोलीस प्रशासनाच्या वतीने या धावपटूचे स्वागत करत तिच्या पुढील प्रवासासाठी सुरक्षितता व यशाच्या शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *