देवगड (प्रतिनिधी)
शतकानुशतके जोपासली गेलेली श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक परंपरा उजळून टाकणाऱ्या मिठबाव श्री देव रामेश्वर पाच दिवसीय डाळपस्वारी सोहळ्यास शनिवार, १३ डिसेंबर रोजी मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. १३ ते १७ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या या डाळपस्वारीने संपूर्ण पंचक्रोशीत भक्तीमय आणि चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण केले आहे.
भक्तीमय वारी, वैयक्तिक न्याय (मेळे), देवतरंग, सेवक भेटी आणि पारंपरिक विधींमुळे तिन्ही गावच्या गाव रयतेमध्ये उत्साह संचारलेला दिसून येत आहे. पंचक्रोशीतून हजारो भाविक या डाळपस्वारीत सहभागी होत असून, गावोगाव आनंदाचे व भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शनिवारी सकाळी श्री देव रामेश्वर मंदिरात गावघर १२/५ देव सेवकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक पूजाविधी पार पडले. सकाळी १० वाजता मंदिरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवतरंगसह डाळपस्वारी नियोजित भेटीगाठींसाठी मार्गस्थ झाली. प्रथम जोगलवाडी येथील कुलस्वामी मंदिरात, तेथील पारंपरिक स्थळी, देऊळवाडी येथील वायंगणकर मांडघर येथे भेट दिली.
दुपारी साडे अकरा वाजता भवांडा भेटीसाठी प्रस्थान करून तेथे पारंपरिक देणंविधी पार पडले. त्यानंतर मिठबाव बाजारपेठ मार्गे गाव वेस पडळी स्थळी भेट देत पारंपरिक देणं विधी पूर्ण करण्यात आले. पुढे गोलतकर ब्राह्मणस्थळ येथे भेट देऊन दुपारी २ वाजता उत्कटवाडी येथील गणेश मंदिरात डाळपस्वारी स्थिर झाली. रयतेचा महाप्रसाद झालेनंतर सायंकाळच्या सत्रातील भेटीगाठीस देवस्वारी मार्गस्थ झाली .
सायंकाळी कोंडवाडी येथील मूळ घर अंकुश ढोके , दत्तमंदिर भेट , फाटकवाडा भवानी मंदिर, गणेशवाडी महापुरुष, चौगुले सेवक,अमोल लोके निवासस्थान महापुरुष,खाडिलकर महाजन आदी ठिकाणी भेटी देण्यात आल्या.रात्री ९ वाजता सुभेदार सेवक यांच्या घरी भेट देऊन भोजन व्यवस्थेनंतर देवतरंग हरीबाची वाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात पहिल्या दिवसाच्या मुक्कामी थांबली. दरम्यान,विनंतीनुसार देवस्वारीने मार्गातील अनेक रयतेच्या घरी भेट दिली असून सुवासिनींनी ओठ्या भरण्यास मोठी गर्दी केली होती.
दुसऱ्या दिवशी १४ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत वैयक्तिक न्याय (मेळे) झाल्यानंतर डाळपस्वारी पुढील प्रवासासाठी निघाली. भंगसाळ डाळप खळ्यावर भेट, म्हसेश्वर पारंपरिक देणं विधी आटपून,तांबळडेग येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात दाखल होण्यासाठी मार्गस्थ झाली. तांबळडेग गावरयतेने देवतरंगाना लेझीम पथकाची सलामी देत,फुलांची पुष्पवृष्टी करत जल्लोषात संपूर्ण गाव रयतेने डाळपस्वारीचे स्वागत केले.
यानंतर दक्षिणवाडा, उत्तरवाडा येथे भेटी देत रयतेला आशीर्वाद देण्यात आले. पुढे वेताळ येथे पारंपरिक देणंविधी पार पडून पेडणेकर मांड येथे भेट दिली त्यानंतर डगरेवाडी येथील कुलस्वामी मंदिरात डाळपस्वारी स्थिर झाली. रात्रीचे भोजन डगरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले. त्यानंतर देवतरंग गजबादेवी मंदिरात मुक्कामी थांबली. १५ डिसेंबर एकादशी असल्याने या दिवशी सर्व तरंग व साज गजबादेवी मंदिरातच विश्रांती घेणार आहेत.दरम्यान वैयक्तिक न्याय मेळे येथे संपन्न झाले.
अनेक दशकांनंतर डाळपस्वारी गावोगाव भेट देत असल्याने रयतेमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. सडा-रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, घरासमोरील अंगणे आणि विद्युत रोषणाईने उजळलेली गावे पाहून ‘देव आपल्या भेटीस येत आहे’ याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत आहे. ही डाळपस्वारी रयतेसाठी एक अविस्मरणीय, भक्तीमय आणि आनंददायी अनुभव ठरत आहे.
