सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल बुक ट्रस्टतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ‘पुस्तक परिक्रमे’ला (Book Parikrama) विद्यार्थी, शिक्षक आणि वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.आज, गुरुवार ११ डिसेंबर रोजी, ही पुस्तक परिक्रमा सकाळी १० वाजल्यापासून कनेडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे उपलब्ध राहणार आहे.
या पुस्तक प्रदर्शन व विक्री परिक्रमेचा शुभारंभ आज सकाळी दहा वाजता कनेडी हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आला. कणकवली तालुक्यातून व परिसरातून उपस्थित असलेल्या विद्यार्थी, शिक्षक व वाचकांनी या परिक्रमेला चांगला प्रतिसाद दिला.
ही परिक्रमा एका मोठ्या आराम बसमध्ये साकारण्यात आली आहे, जी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून सिंधुदुर्गहून गोवा राज्यात दाखल होणार आहे. या परिक्रमेत विविध प्रकारची इंग्रजी, हिंदी व मराठी पुस्तके प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये बालसाहित्य, ऐतिहासिक, वैज्ञानिक, तसेच लहान मुलांसाठीचे साहित्य आदी पुस्तकांचा समावेश आहे.
सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात वाचकांना वाचनाची गोडी लागावी आणि मुलांमध्ये वाचनाबद्दलची रुची निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
परिक्रमेचे व्यवस्थापक अमितकुमार मिश्रा यांनी सांगितले की, वाचकांचा उत्साह पाहून ही परिक्रमा वेंगुर्ले तसेच इतर ठिकाणीही जाणार आहे. अनेक वाचकांनी या परिक्रमेतून पुस्तकांची खरेदी केली असून, दुर्मिळ पुस्तके उपलब्ध झाल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. कनेडी प्रशालेत या पुस्तक परिक्रमा व्हॅनचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी आनंदात स्वागत केले.
