बांदा (मंगल कामत) १७ ऑगस्ट २०२४
धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 250 वृक्षांचे बांदा ग्रामपंचायतकडे हस्तांतरण
– डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांच्या वतीने बांदा स्मशानभूमी नजीक लागवड करण्यात आलेल्या 250 वृक्षांचे बांदा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात आले. प्रतिष्ठानने 2018 सालात या रोपांची केवळ लागवड करून न थांबता त्यांचं पूर्ण संगोपन केले आणि हे मोठे वृक्ष बनवून बांदा ग्रामपंचायतला सुपूर्द केले. बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत, ग्रामविकास अधिकारी लीला मोर्ये यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून हे हस्तांतरणाचे पत्र बांदा ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आले .
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
आरोग्य शिबीर, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, रक्तदान शिबीर, साक्षरता वर्ग, स्वच्छता मोहीम अशाप्रकारचे उपक्रम या प्रतिष्ठानतर्फे भारताच नव्हे तर जगभरात राबविले जातात.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून या प्रतिष्ठानने सन २०१८ मध्ये बांदा स्मशानभूमीच्या परिसरामध्ये २५० वृक्षांची लागवड केली व त्या वृक्षांचे आतापर्यंत अतिशय शिस्तप्रिय व नियोजनपूर्वक वृक्षसंवर्धन केले आहे.या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी पद्मश्री व महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक रविवारी श्री बैठक बांदा येथील श्री सदस्य शिस्तप्रिय पद्धतीने व नियोजनपूर्वक निष्काम श्रीसेवा करत होते. हि शिकवण समाजाने आजच्या युगामध्ये अंगिकारणे जरूरीचे आहे. पर्यावरणास पूरक असणाऱ्या अशा या २५० वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म असलेली झाडे आहेत.
या अशा स्तुत्य उपक्रमामध्ये बांदा ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सदस्य व बांदा ग्रामस्थ यांना उपक्रमास संधी दिल्याबद्दल डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले तसेच सदैव अशा उपक्रमांसाठी सहकार्याचे आश्वासन देण्यात आले
