देवगड / प्रतिनिधी
मोकाट गुरांवर प्रतिदिन १००० रुपयाची दंडात्मक कारवाई ; गुरे मालकाने गुरे न नेल्यास लिलाव करण्याचा घेतला एकमुखी ठराव
देवगड- जामसंडे नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट गुरांचा विषय चांगलाच गाजला. न. पं. ने पकडलेल्या मोकाट गुरांवर प्रत्येक गुरामागे प्रतिदिनी १ हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच पकडलेली मोकाट गुरे दहा दिवसांत गुरेमालकांनी न नेल्यास त्या गुरांची लिलाव प्रक्रिया करण्याबाबतचा महत्वपूर्ण ठराव घेण्यात आला.
देवगड- जामसंडे न. पं. ची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत, प्रभारी मुख्याधिकारी गौरी पाटील (कणकवली), न. पं. बांधकाम सभापती शरद ठुकरूल, स्वच्छता सभापती सौ. आद्या गुमास्ते आदी उपस्थित होते. न. पं. ने देवगड- जामसंडे कार्यक्षेत्रातील मोकाट गुरांवर कारवाई करण्याची मोहिम राबविली असून यामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या २० मोकाट गुरांना पकडण्यात आले. त्यापैकी १९ गुरे संबंधित गुरेमालकांनी दंड भरून नेली असल्याची माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभू व स्वच्छता समिती सभापती सौ. आद्या गुमास्ते यांनी दिली. यावेळी संबंधित गुरेमालकांना प्रत्येक मोकाट गुरांसाठी २०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. यावर हा दंड अल्प प्रमाणात असल्याने संबंधित गुरेमालक आपली गुरे पुन्हा मोकाट सोडत आहेत. मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे परिसरात शेतीचे नुकसान होत आहेत. तसेच ही मोकाट गुरे अपघातांनाही निमंत्रण देत आहेत. देवगड, जामसंडे शहरात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला असून या गुरांचा मालकांना किती दिवस समजून घेणार, असा सवाल नगरसेवक संतोष तारी यांनी उपस्थित करून संबंधित गुरेमालकांवर कायदेशीर करावी. संबंधित गुरे मालकांवर न्यायालयामार्फत कारवाई करण्यासाठी न. पं. प – शासनाने प्रयत्न करावेत, अशी सूचना नगरसेवक संतोष तारी यांनी केली. न. पं. प्रशासनाला गुरेमालक सहकार्य करीत नसून त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी सूचना व्ही. सी. खडपकर, सुधीर तांबे यांनी केली. यावेळी न. पं. च्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर मोकाट गुरे सोडणाऱ्या गुरेमालकांना प्रतिदिनी प्रत्येक गुरामागे १ हजार रुपयांची दंडात्मक करण्यात येईल. तसेच पकडण्यात आलेली गुरे दहा दिवसांत गुरेमालकांनी न नेल्यास त्या गुरांची लिलाव प्रक्रिया करण्यात येईल, असा महत्वपूर्ण ठराव एकमताने सभागृहात घेण्यात आला.
