मडूरा रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत कोरे प्रशासनाला निवेदन
बांदा (मंगल कामत) ८ ऑगस्ट २०२४
मडूरा रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत मडूरा रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत स्टेशन मास्तर यांना निवेदन सादर करण्यात आले. कोकणकन्या, मांडवी व राज्यराणी एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणे, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेणे यांसह विविध मागण्या बाबत कोरे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.
सिंधुदूर्ग जिल्हा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मडूरा रेल्वे स्थानकावर भेट देत स्टेशन मास्तर श्री. शेख यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पावसकर, नागेश ओरोसकर, अजय मयेकर, शुभम परब, जयेंद्र परब, स्वप्निल गावडे, संजय वालावलकर, साई आंबेरकर, मडूरा रेल्वे प्रवासी संघटनेचे सुरेश गावडे, कास सरपंच प्रवीण पंडित, किनळे सरपंच दीपक नाईक, तळवणे सरपंच गोविंद केरकर, उल्हास वालावलकर आदी उपस्थित होते.
मडूरा येथे आवश्यक जागा उपलब्ध असल्यामुळे रेल्वे टर्मिनस उभारणीसाठी रेल्वे प्रशासनाने Xप्राधान्य द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्याने सामावून घ्यावे, कोकणकन्या, मांडवी व राज्यराणी एक्सप्रेसना मडूरा स्थानकावर थांबा द्यावा, स्टेशनकडे येणाऱ्या रस्त्यावरील डांबरीकरण उखडून गेल्याने खडी अस्ताव्यस्त विखुरली आहे. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन तातडीने रस्ता मजबुतीकरण करणे अशा अनेक लेखी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसना थांबा मिळावा. तसेच राज्यराणी एक्सप्रेस सावंतवाडी ऐवजी मडूरा येथून सोडावी या मागणीसाठी भविष्यात रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्याचा मडूरा प्रवासी संघटनेचा इरादा असल्याचे सुरेश गावडे यांनी स्पष्ट केले. सिंधुदूर्ग जिल्हा प्रवासी संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा राहिल, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी दिली.
—
