मुंबई (प्रतिनिधी)
मत्स्योत्पादनामध्ये क्रमांक एकचे राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता- केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह
देशाचे मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी सर्व राज्यांनी सहकार्याने काम करण्याची गरज व्यक्त
किनारपट्टी वरील मच्छीमारांच्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्राने भूमिका घ्यावी – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मत्स्योत्पादनात देशात आज आंध्रप्रदेशचा वाटा 32 टक्क्यांचा आहे. तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून 13 टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. हा हिस्सा 32 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवून देशातील सर्वाधिक मत्स्योत्पादन करणारे राज्य होण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये असून महाराष्ट्राचे तरूण मत्स्यव्यवसाय मंत्री यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लंलन सिंह यांनी केले. तसेच देशाचे मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी सर्व राज्यांनी एकत्रित आणि सहकार्याने काम करण्याचे आवाहनही केंद्रीय मंत्री सिंह यांनी केले. तर मच्छिमारांना घरे देण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल उचलून एक चांगली योजना तयार करावे अशी मागणी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केली.
देशातील मत्स्यव्यवसातील संधी, आव्हाने आणि समस्या याविषयी किनारपट्टीच्या राज्यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची एकत्रित बैठक हॉटेल ताज पॅलेस येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एस.पी.सिंग बाघेल, केद्रीय पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री जॉर्ज कुरियन, कर्नाटकचे मत्स्यव्यवसाय मंत्री मनकाला वैद्य, आंध्रप्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री किनजारापू अत्चाननायडू, गोव्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री निलकांत हालरनकर, गुजरातचे मत्स्यव्यवसाय मंत्री पुरषोत्तमभाई पटेल, केंद्रीय मत्स्यव्यवसाय सचिव अभिजित लिख्वी, सह सचिव नितू प्रसाद आदींसह 9 राज्य व 4 केंद्रशासित प्रदेशातील मत्स्यव्यवसाय सचिव, आयुक्त, संचालक व अधिकारी उपस्थित होते.
