कणकवलीत 23 फेब्रुवारीला सर्वधर्मिय वधू-वर मेळावा ; आधार फाउंडेशनतर्फे आयोजन
सर्वच समाजांमध्ये मुला-मुलींची लग्न जुळणे ही गंभीर समस्या बनली आहे. मुली व त्यांच्या पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे मुला-मुलींची लग्न जुळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी आधार फाउंडेशनने पुढाकार घेतला असून आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्गच्यावतीने रविवार 23 फेब्रुवारीला कलमठ येथील वृंदावन हाॅल येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत 25 वर्षांवरील सर्वधर्मिय आणि आंतरजातीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहितीआधार फाउंडेशनचे सचिव ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. वेंगुर्लेकर बोलत होते. यावेळी चंद्रशेखर उपरकर, सीताराम उर्फ दादा कुडतरकर, प्रा. हरिभाऊ भिसे, सुशील सावंत उपस्थित होते.या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व धर्मांतील वधू-वरांनी आणि त्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे. या मेळाव्यात लग्न जुळणाऱ्यांचा मे महिन्यात कणकवली किंवा माणगाव येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती आधार फाउंडेशनचे सचिव ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली.
ॲड. नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच समाजांमध्ये मुला-मुलींची लग्न जुळणे ही गंभीर समस्या बनली आहे. मुली व त्यांच्या पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे मुला-मुलींची लग्न जुळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी आधार फाउंडेशनने पुढाकार घेतला असून फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर, कुडाळ याठिकाणी वधू-वर मेळावे घेण्यात आले आहेत. यंदा कणकवली येथे 25 वर्षांवरील सर्वधर्मिय आणि आंतरजातीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सर्व सामाजातील मुला-मुली व त्यांच्या पालकांनी सहभागी झाले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात दरवर्षी प्रत्येक समाजाचे तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर वधुवर मेळावे आयोजित होत आहेत, परंतु म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद वधू पक्षाकडून मिळत नाही. सध्याच्या परिस्थितीत 38 ते 40 हजारपेक्षा अधिक वर आजही वंचित राहिलेले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मुला-मुलींचे विवाह न जमने ही एक कौटुंबिक समस्या बनली आहे. लग्नाबाबत मुली व त्यांच्या पालकांच्या वाढलेला अपेक्षा याला कारणीभूत ठरत आहेत. त्यांचे समुपदेश करण्याचे काम आधार फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. कणकवलीतील मेळाव्यात जिल्ह्यातील जास्तीत विवाह इच्छुक मुला-मुलींनी नोंदणी करून या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. वरांबाबत मुली व त्यांच्या पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांबाबत काही तडजोड करून मुलींचे लग्न जमवावे, जेणे करून त्यांचे पुढील आयुष्य चांगले जाईल. कणकवलीतील मेळावा यशस्वी झाल्यानंतर 16 मार्चला सावंतवाडीत अशाप्रकारे वधू-वर मेळावा आयोजित केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात रोजगार देणारे प्रकल्प नसल्याने बहुतांशी तरुण बेरोजगार आहे. त्यामुळे बेरोजगारांची लग्न जुळत नाहीत. बेरोजगारांना रोजगार मिळेल, असे प्रकल्प सुरु करण्यासाठी शासनकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा चंद्रशेखर उपरकर यांनी व्यक्त केली. आंतरजातीय विवाहसाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत, याची माहिती दादा कुडतरकर यांनी दिली. कणकवलीतील वधू-वर मेळाव्यात सर्व समाजातील विवाह इच्छुक मुला-मुलींना व त्यांच्या पालकांनी सहभागी होऊन आपल्या पाल्यांसाठी योग्य वधू किंवा वर निवडण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा सुशील सावंत यांनी व्यक्त केली.