देवगड (प्रतिनीधी)
वाहनाच्या धडकेने तिसरा डोळा कोसळला ; कुणकेश्वर सागरी महामार्गावरील घटना
वाढती वाहनांची संख्या,भरधाव वेगाने असणारी वाहनांची वर्दळ आणि त्यातून होणारे अपघात तसेच जिल्ह्यात होणाऱ्या घडामोडींवर लक्ष राहावे म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने महामार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली.महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरा लागल्याने अनेक गोष्टीला मर्यादा आल्यात.कोणत्या वेळी कोणती घटना घडली ही सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळू लागल्याने तपासाच्या दृष्टीने पाहिले तर पोलीस यंत्रणेचा थोडाफार ताण कमी झाला. मात्र आज स्थितीत पाहिले तर महामार्गावर बसविलेल्या कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्ती संबधित यंत्रणेकडून व्यवस्थित रित्या केली जातेय का ? हा प्रश्न वारंवार वारंवार उपस्थित होतोय.
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिराकडे या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांची देखभाल दुरुस्ती होत नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेला काम व त्यात त्यावर बसविण्यात आलेला बॉक्स गेल्या दोन महिन्यापूर्वी कोसळला होता. जवळपास आठ दिवसानंतर याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र आज पुन्हा दोन महिन्याच्या फरका नंतर वाहनाने धडक दिल्याने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेला खांबच उन्मळून पडला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणा व सदर यंत्रणेची बसविलेली मशिनरीचा बॉक्स असलेला पोल एका बाजूने तरंगताना दिसत आहे. शिवाय या सीसीटीव्ही ला जोडलेली केबल रस्त्यावर पडलेली आहे. कुणकेश्वर मधील सीसीटीव्ही यंत्रणेच्या हे प्रातिनिधिक स्वरूप आहे मात्र जिल्हाभरात महामार्गावर बसविलेली सीसीटीव्ही यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे बनले आहे.
