कणकवलीत निघाली वारकरी दिंडी..! संप्रदायाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवुया 

 

कणकवली (प्रतिनीधी)

कणकवलीत निघाली वारकरी दिंडी..! संप्रदायाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवुया 

ज्यावेळी आपण धर्माचे रक्षण करण्याचे काम करतो, त्यावेळी आपले रक्षण करण्याचे काम परमेश्वर करत असतो -विश्वनाथ गवंडळकर

आपण सर्व वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते आहोत. संप्रदायाचे कार्य करत असताना देव, देश आणि धर्माचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ज्यावेळी आपण धर्माचे रक्षण करण्याचे काम करतो, त्यावेळी आपले रक्षण करण्याचे काम परमेश्वर करत असतो. त्यामुळे हे कार्य आपण अविरतपणे सुरू ठेवायचे आहे, असे आवाहन सिंधुदुर्ग वारकरी संप्रदायचे अध्यक्ष ह. भ. प. विश्वनाथ गवंडळकर यांनी केले.

 

 

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायच्या वतीने रविवारी कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, यावेळी ते बोलत होते. माजी आ. वैभव नाईक, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा वारकरी संप्रदायचे उपाध्यक्ष ह.भ.प. सावळाराम कुर्ले, कार्याध्यक्ष ह.भ.प. रामचंद्र कदम, खजिनदार मधुकर प्रभुगावकर, सचिव राजू राणे उपस्थित होते.

 

 

या मेळाव्याच्या निमित्ताने भालचंद्र महाराज संस्थान ते बाजारपेठ मार्गे वसंतराव आचरेकर संस्था सभागृहापर्यंत टाळ मृदंगासह हरिपाठ व .व हरिनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली.

 

 

सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड म्हणाले, साधू संतांची शिकवण फार मोठी आहे. ही शिकवण तरुण पिढीला देण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करत आहेत. मानवी मनात जे अवगुण आहेत त्यावर टाळ व मृदुंगाच्या सहाय्याने वार करणारे असे हे वारकरी संप्रदाय आहे.त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सांगितले.

 

 

मनीष दळवी म्हणाले, हिंदू धर्माची विचारधारा टिकवण्याचे काम खऱ्या अर्थान कोणी केले असेल तर वारकरी संप्रदायाने केले आहे. वारकरी संप्रदायाला जे काही सहकार्य हवे असेल ते केले जाईल असे आश्वासन दिले. दीक्षांत देशपांडे म्हणाले, वारकरी संप्रदाय हा त्याग व प्रेम या दोन गोष्टींवर उभा आहे. त्यामुळे या संप्रदायामध्ये कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला जात नाही, असे सांगितले.

 

 

 

या मेळाव्या दरम्यान ह.भ.प. रमाकांत गायकवाड (फोडा- कणकवली) व ह.भ.प. तायाराम रामचंद्र गुरव (नर्ले-वैभववाडी) यांना सांप्रदायाच्या मानाच्या संत सेवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच ज्येष्ठ कीर्तनकारांना श्रीफळ व पुष्प देऊन गौरविण्यात आले. वारकरी मेळाव्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या दिंडीच्यावेळी पटवर्धन चौकात बांधवांनी केलेले रिंगण डोळयांचे पारणे फेडणारे होते.सूत्रसंचालन राजू राणे यांनी तर आभार संतोष राऊळ यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *