परभणी येथील घटनेबाबत देवगड तहसीलदारांना देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने निवेदन

 

 

देवगड (प्रतिनीधी)

परभणी येथील घटनेबाबत देवगड तहसीलदारांना देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने निवेदन

पोलीस कोठडीतील युवक मृत्यू जबाबदार असलेल्या दोषीवर कठोर कारवाई व्हावी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी

 

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका माथेफिरू व्यक्तीने केली. तसेच या घटनेचे पडसाद परभणीत व राज्यात उमटले. आंबेडकरी जनतेनी या कृतीचा निषेध व्यक्त केला. त्यातून आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन करून नाहक मारहाण केली. पोलीस कोठडीत अटक असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या उच्चशिक्षित तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. यातील मुख्य मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा अशी मागणी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुखमंत्री यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ यांच्यावतीने मंगळवारी देवगड तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करून परभणीतील संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबनेबाबत व पोलिसांनी केलेल्या नाहक मारहाणीत गेलेला युवकांचा बळी या सर्व घटनेबाबत तीव्र शब्दात भावना व्यक्त करण्यात आल्या. राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. तसेच देवगड पोलीस निरीक्षक यांनाही भेटून निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले कि, 9 डिसेंबर रोजी परभणी गंगाखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात संपूर्ण राज्यात बहुजन समाज आपल्या तीव्र भावना सरकार दरबारी निवेदन देऊन व मोर्च्याच्या माध्यमातून व्यक्त करीत आहेत. यामध्ये देवगड तालुक्यातील आंबेडकर अनुयायी देखील सामील आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत लाखो नागरिक तुरुंगात गेले. अनेकानी आपले रक्त सांडत शहीद झाले. स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक दशकाच्या वाटचालीत स्वातंत्र्याबद्दल सामान्यांच्या आशा-आकांक्षा पल्लवीत झाल्या. देशवाशियांनी स्वप्न पाहिले. त्या त्यांच्या भावना जाहीरपणे व्यक्त झाल्या. देशवशियांच्या त्या स्वप्नांना व भावनांना लिखित स्वरूपात व्यक्त करणारा दस्तऐवज म्हणजेच आपले भारतीय संविधान आहे.

या सविधानाचा अपमान म्हणजे स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याऱ्या शहीदांचा अपमान आहे. भारतीय नागरिकांचा गौरव व सन्मान ग्रंथ म्हणजे संविधान आहे. या सन्मान ग्रंथाचा काही देश विघातक मंडळी अपमान करू पाहत आहेत हे गंगाखेड येथील घटनेतून दिसून येते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच आंदोलन करणाऱ्या समाज बांधवांवर पोलिसांनी नाहक मारहाण केली. कोम्बिंग ऑपरेशन करून अत्याचार केलेत. या मारहाणीत पोलीस कोठाडीत असलेला उच्च शिक्षित युवक सोमनाथ सूर्यवंशी मयत झाला आहे. याची दंडाधिकारी किंवा न्यायाधीश यांचेमार्फत त्याने भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम 2033 कलम 186 प्रमाणे चौकशी करावी. तसेच मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 120 (2) 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून यातील दोषींना अटक झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर जाधव, खजिनदार प्रभाकर साळसकर, सल्लागार विजय कदम, श्रीपत जाधव, उत्तम कांबळे, अनिल पुरळकर, विश्वनाथ पडेलकर, के. एस. कदम, विलास जामसंडेकर, संतोष कदम, आनंद देवगडकर, दीपक नाईक, देवगड न. प. उपनगराध्यक्ष मिताली सावंत, नगरसेविका मनीषा जामसंडेकर, सौ. पडेलकर, अपर्णा जाधव, देवदत्त कदम, सागर जाधव, संतोष तळवडेकर, प्रदीप नाईक, दिलीप कदम, दिलीप मुंबरकर, प्रकाश जाधव, बबन जाधव, नितेश जाधव, संदीप जामसंडेकर, रत्नदीप कांबळे, भाऊ मुंबरकर, प्रवीण मोरे, पी. वाय. कांबळे, सुरेश कदम, सुरेश जाधव, प्रदीप सावंत, राजदीप मुंबरकर तसेच बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *