खाऊगल्ली सारखी अतिशय उत्कृष्ट संकल्पना समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविली -आमदार नितेश राणे

0 minutes, 2 seconds Read

 

 

कणकवली  (तुळशीदास कुडतरकर) 

खाऊगल्ली सारखी अतिशय उत्कृष्ट संकल्पना समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविली -आमदार नितेश राणे

कणकवलीतील बच्चे कंपनीचा आनंद द्विगुणित ;हजारो लोकांची उपस्थिती; आ. नितेश राणेंनी मानले उपस्थितांचे आभार

कणकवलीकरांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे. म्हणूनच पूर्ण कोकण पट्टया मध्ये एक नंबरच लीड घेऊन तुमचा आमदार महाराष्ट्रात व यादीमध्ये आलेला आहे. समीर नलावडे मित्रमंडळ व त्यांचे कार्यकर्ते, सहकारी कणकवलीकरांची निस्वार्थी सेवा सातत्याने करत आलेले आहेत. कणकवली मध्ये आहे ते अन्य कोणत्याही शहरात नाही हे आम्ही हक्काने सांगतो. म्हणूनच खाऊगल्ली सारखी अतिशय उत्कृष्ट संकल्पना समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समीर नलावडे मित्र मंडळाच्या माध्यमातून राबविली आहे.म्हणूनच कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची सायंकाळ यादगार ठरली आहे.यामुळेच गणपती साना परीसर लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेला आहे.यासाठीच मी सर्व पालकांचे आभार मानतो आणि या उपक्रमाचे आयोजन करुन लहान मुलांचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करतो.असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. ते कणकवली गणपती साणा येथील खाऊ गल्ली कार्यक्रमात रविवारी बोलत होते.

आमदार नितेश राणेंच्या हस्ते खाऊ गल्ली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, माजी नगरसेवक अभि मुसळे, किशोर राणे, संजय कामतेकर, बंडू गांगण, रवींद्र गायकवाड, अण्णा कोदे, मेघा गांगण, कविता राणे, सुप्रिया नलावडे, प्राची कर्पे, साक्षी वाळके, संजना सदडेकर, प्रतीक्षा सावंत, सिंधुदुर्ग बँक संचालक विठ्ठल देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले की,कणकवलीमध्ये आजूबाजूला जर पाहिलं तर कणकवलीत बदल झालेले जरूर दिसत आहेत. कणकवली व जाणवली जोडणारा पूल, बारमाही वाहणारा धबधबा, याचा अनुभव घेत असताना मतदार, नागरिक म्हणून घेत असताना हा बदल कोणामुळे झाला, कोण आपली सेवा करत आलेले आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे.

आजच्या परिस्थितीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांकडे कोणतंही अधिकृत पद नाही तरीही ते सेवा करत आहेत. त्यांनी दिलेला शब्द या कणकवलीचा चेहेरा मोहरा आम्ही बदलून दाखवू जो शब्द दिलेला तो कृतीतून पूर्ण करून दाखवला आहे. याबद्दल त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. कणकवलीत दाखवण्यासारखे भरपूर काही आहे. काही महिन्यानंतरच नगरपंचायत ची निवडणूक आहे. विकास कामांच्या दृष्टीने जर पाहिलं तर ती निवडणूक बिनविरोध द्यायला काहीही हरकत नाही. त्यामुळे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी अर्ज भरावा आणि थेट त्या खुर्चीवर जाऊन बसाव. निवडणूक लढवायची गरजच पडणार नाही एवढी विकास काम आपण केली आहेत. असे सांगून आमदार नितेश राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

एक दिवस छोट्यांचा’ अर्थातच खाऊ गल्ली या उपक्रमाला उदंड प्रतिसाद

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने गणपती सान्यावर ‘एक दिवस छोट्यांचा’ अर्थातच खाऊ गल्ली या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, विविध खेळ – खेळणी, मिकी माऊस, कार्टून्स, जादूगार प्रसाद यांचे जादूचे प्रयोग सोबत संगीत, नृत्य, किलबिल जल्लोष या साऱ्याचा मनमुराद आनंद लुटत लहान मुलांनी अक्षरशः धम्माल केली.

खाऊ गल्ली उपक्रमामुळे टेंबवाडी रस्ता ते गणपती सान्यापर्यंत संपूर्ण परिसर गर्दीने गजबजून गेला 

खाऊ गल्ली उपक्रमामुळे टेंबवाडी रस्ता ते गणपती सान्यापर्यंत संपूर्ण परिसर गर्दीने गजबजून गेला होता. अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील दुतर्फा लागले होते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकानेही होती. बच्चे कंपनीसाठी खास गोल फिरणाऱ्या गाड्या, झोपाळे असे विविध प्रकारचे खेळ होते. लहान मुलांना आनंद, मज्जा मस्ती करता यावी यासाठी काही वर्षापासून सातत्याने समीर नलावडे मित्र मंडळाच्यावतीने खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन केले जाते.

खाऊ गल्ली उपक्रमाला लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा भरभरून प्रतिसाद 

यावर्षीही या उपक्रमाला लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.यावेळी रविवारी सायंकाळी गणपतीसाना परिसर लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. उद्घाटनापूर्वी लहान मुलांनी पन्नास रुपयाचे कुपन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुलांनी विविध खेळ खेळून कार्टून सह सेल्फी पॉईंटवर रेंगाळत खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. मिकी माऊस, छोटा भीम, डोरेमॉन अशी कार्टून्सने लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांच्यासोबत धम्माल केली. लहान मुलांना प्रश्न विचारून त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. त्याचप्रमाणे मुलांसाठी लकी ड्रॉ काढून बक्षिसेही दिली.यावेळी लहान मुलांची आणि पालकांची उपस्थितीती लक्षणीय होती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *