जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागेवर पुन्हा एकदा भगवा फडकून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील – माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशतवाद गाडून टाकण्यासाठी आम्ही एकमेकांना विरोध करणारे आज एकत्र आलो आहोत. ही आमच्यातील एकी अभूतपूर्व असून जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागेवर पुन्हा एकदा भगवा फडकून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा विश्वास माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केला. तर कोणी कितीही दावा केला तरी जिल्ह्यातील माजी सैनिक हे माझ्यासोबतच होते आणि माझ्या सोबतच राहतील असेही ते म्हणाले. ब्रीगेडियर सावंत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचार कार्यालयात परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आहेत. आज ते अन्य पक्षात जरी असले तरी विचाराने माझ्या सोबतच आहेत. माजी सैनिकांच्या सोयीचे असलेले या ठिकाणचे कॅन्टीन बंद करण्यात आले. माजी सैनिकांमध्ये याचा राग आहे. आम्ही एकूण बारा मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या होत्या. त्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी झिडकारल्या हा माजी सैनिकांचा अपमान आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणी कितीही दावा केला तरी माजी सैनिक हे माझ्यासोबतच होते आणि माझ्यासोबतच राहणार आहेत. राजन तेली यांच्या बाबतीत मतदार चांगले वातावरण आहे. मागील दोन महिन्यापूर्वी आपण मतदार संघातील 17 गावांमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल लोकप्रियता दिसून आली. एकूणच त्यांचे काम आणि कार्य पाहता त्यांना या ठिकाणी विजय सोपा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राजू मसुरकर ठाकरे सेना तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आदी उपस्थित होते.