देवगड- प्रतिनिधी
वाहनाला साईड देताना एसटी कलडंली दरीत ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
सर्व प्रवासी सुखरूप ; मोंडपार येथील घटना
ग्रामीण भागात शालेय एसटी फेऱ्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्या मध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे मात्र वारंवार मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर एसटीचे वारंवार अपघात होत आहेत. येथील ग्रामस्थांनी केलेल्या मागणीकडे वारंवार संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत असल्यानेच या मार्गावर अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. याची गांभीर्याने संबंधित प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.
देवगड तालुक्यातील मोंडपार अनभवणेवाडी येथे वाहनाला बाजू देताना एसटी रस्त्यानजीक कलंडली. या रस्त्यानजीक सुमारे ५० फूट खोल दरी असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या एसटीतील विद्यार्थी व प्रवाशांना एसटीच्या संकटकालीन मार्गाने (दरवाजा) एसटीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही घटना बुधवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड एसटी स्थानकातून देवगड- तळेबाजार- वानिवडेमार्गे मोंड ही बसफेरी सकाळी ८ वा. सुटते. या एसटी बसफेरीचा लाभ शालेय विद्यार्थी घेत असतात. गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर बुधवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मोंड एसटीतून प्रवाशांसह विद्यार्थीही प्रवास करीत होते. ही एसटी मोंडपार अनभवणेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेनजीकच्या अरुंद वळणावर आली असता समोरून आलेल्या वाहनाला बाजू देताना एसटी रस्त्यानजीक कलंडली. चालकाने प्रसंगावधान राखून एसटी नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. विद्यार्थ्यांसह एसटीतील प्रवाशांना एसटीच्या संकटकालीन मार्गाने (दरवाजा) एसटीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ मदतकार्यात सहभागी झाले होते. या रस्त्यानजीक सुमारे ५० फूटाची खोल दरी असून तेथे संरक्षक भिंत व्हावी, अशी मागणी होत आहे. मोंड परिसरात अरुंद रस्ते असून वाहतुकीची वर्दळ जास्त असते त्यामुळे वारंवार एसटीचे अपघात या ठिकाणी होत आहेत. आतापर्यंतचा हा तिसरा अपघात आहे. मात्र याकडे अद्यापही दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.
