देवगड – प्रतिनिधी
दाभोळे येथे एसटी व दुचाकी अपघात ; दुचाकी एसटी खाली ; एक गंभीर
देवगड तालुक्यातील दाभोळे येथील डॉ. पाटणकर यांच्या हॉस्पिटलसमोरील एका अरुंद व धोकादायक वळणावर एसटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात इळये- पाटथर येथील दुचाकीस्वार विश्वनाथ हरी कोंडस्कर (५५) हे गंभीर जखमी झाले. एसटीची धडक बसताच कोंडस्कर हे रस्त्याच्या बाजूला गेले, तर त्यांची दुचाकी थेट एसटीच्या खाली जात स्थिरावली. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. कोंडस्कर यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विजयदुर्ग एसटी आगाराची मिठबाव- देवगड- विजयदुर्ग ही एसटी (एमएच १४, १६९८) बसफेरी मिठबावहून देवगडच्या दिशेने येत होती. तर कोंडस्कर हे देवगडहून खाकशी- दाभोळेमार्गे इळये पाटथर येथे आपल्या घरी परतत होते. दाभोळे येथील डॉ. पाटणकर हॉस्पिटलसमोरील एका अवघड वळणावर कोंडस्कर यांच्या दुचाकीला एसटीची धडक बसली. या धडकेत कोंडस्कर हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. तर दुचाकी थेट एसटीच्या मधोमध मागील चाकानजीक जात स्थिरावली. एसटी चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ एसटी थांबवली. अन्यथा, मोठा अनर्थ घडला असता. जखमी झालेल्या कोंडस्कर यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच देवगडचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश पाटील यांच्यासह देवगड एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, स्थानकप्रमुख श्रीकांत सैतावडेकर, कनिष्ठ सहाय्यक योगेश पांचाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दुचाकीस्वार कोंडस्कर यांच्या कुटुंबीयांनी अपघाताबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे एसटी प्रशासन व पोलीस प्रशासनाला लेखी दिल्याने या अपघातप्रकरणी कोणतीही नोंद देवगड पोलीस स्थानकात उशिरापर्यंत झाली नव्हती.
