सिंधुदुर्ग सुपुत्राच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस संघ देशात ‘चॅम्पियन’! ; प्रशिक्षक संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार कामगिरी

0 minutes, 2 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

दिल्लीतील ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र राज्य पोलीस संघाने आरपीएफ (RPF) संघाचा पराभव करत ‘दुसऱ्या ऑल इंडिया पोलीस क्रिकेट’ स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या पोलिस संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले. सिंधुदुर्ग सुपुत्र संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने हे विजेतेपद पटकाविले आहे.

 

अंतिम सामन्यात आरपीएफने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्राच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. कर्णधार सुनील पाटील, रोहित पोळ, योगेश पाटील, श्रीकांत लिंबोळे आणि योगेश शिंदे यांच्या फटकेबाजीमुळे महाराष्ट्राने २० षटकांत २५१ धावांचा डोंगर रचला. २५२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या आरपीएफला मध्यमगती गोलंदाज रोहित बेहरे याने सुरुवातीलाच धक्के दिले. त्याने ५ बळी घेत आरपीएफची कंबरडे मोडले. त्याला योगेश शिंदे यांनी मोलाची साथ दिली.

या स्पर्धेत महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले होते. बेंगलोर येथील अलूर मैदानावर सीआयएसएफ, झारखंड, गोवा आणि गुजरात या संघांना हरवून महाराष्ट्र पश्चिम विभागातून विजेता ठरला. तर ग्रेटर नोएडा येथे सीमा सशस्त्र दलावर विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली. गतविजेत्या आणि प्रबळ दावेदार दिल्ली संघाचा पराभव करून महाराष्ट्राने गेल्या वर्षीच्या पराभवाचा बदला घेतला आणि अंतिम फेरीत धडक मारली.

 

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव या ऐतिहासिक विजयाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, अप्पर पोलीस महासंचालक मधुकर पांडे, पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश आणि श्री. पडवळ, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी संपूर्ण संघाचे, खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

 

या स्पर्धेत रोहित बेहरे यांना सामनावीर हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर रोहित पोळ यांची उत्कृष्ट फलंदाजी आणि सुनील पाटील यांची संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी झाली. संघाच्या या यशात प्रशिक्षक रोहन बगाडे, संदेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा अधिकारी संतोष कांबळे, निवृत्त सहा. पोलीस आयुक्त दीपक पाटील, एमसीए सहसचिव निलेश भोसले आणि रणजी खेळाडू संतोष शिंदे यांनी खेळाडूंची अचूक निवड केली होती.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *