Oplus_16908288

आंबा कलम बागेत घुसून कामगारावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; पोयरे येथे मध्यरात्रीचा थरार ; चार अनोळखी संशयितांविरुद्ध देवगड पोलिसांत गुन्हा

0 minutes, 1 second Read

 

देवगड (प्रतिनिधी)

 

देवगड तालुक्यातील पोयरे येथील एका आंबा कलम बागेमध्ये अनधिकृत प्रवेश करून बागेत आंबा राखणीच्या कामास असलेल्या कमल साधू नाथ (१९, सध्या रा. पोयरे, मूळ रा. निगासन लखिमपूर खिरी, रा. उत्तरप्रदेश) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यावर कोयत्याने प्रहार केल्याप्रकरणी चार अनोळखी संशयितांवर देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही घटना ५ मार्च रोजी रात्री ११.३० वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप हुन्नारी यांची पोयरे येथील कलम बाग मालवण येथील गणेश चव्हाण यांनी करारावर घेतली आहे. या बागेत कमल साधू नाथ, सोनू राजपाल नाथ, नितीन रामू नाथ यांच्यासह काही कामगार आंबा राखणीचे काम करतात. सदर कलम बागेत ५ मार्च रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास दोन अनोळखी इसम आंबे तोडत असल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले.

 

यावेळी कामगारांपैकी नितीन नाथ याने त्या अनोळखी इसमांना “आंबे तोडू नका”, असे सांगितले असता त्या अनोळखी इसमांनी नितीन नाथ याला शिवीगाळ करून त्याच्या कानाखाली मारले. त्यानंतर ते अनोळखी इसम तेथून स्वीफ्ट कारमध्ये बसून निघून गेले. या घटनेची माहिती सोनू नाथ याने देवगड पोलीस स्थानकात दिल्यानंतर देवगड पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री ११.३० वा. च्या सुमारास स्वीफ्ट कारमधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी सदर बागेत अनधिकृत प्रवेश केला.

 

त्या संशयितांनी गाडीतून कोयता बाहेर काढत संशयित हे बागेतील कामगारांच्या अंगावर धावून गेले. तसेच संशयितांनी कमल नाथ याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यावर कोयत्याने प्रहार केला. या घटनेची फिर्याद सोनू नाथ याने देवगड पोलीस स्थानकात दिली असून फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी चार अनोळखी संशयितांवर भारतीय न्याय संहिता ११८ (१), ११५ (२), १३१, ३२९ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *