महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये संदेश पारकर : कलमठ येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

धकाधकीच्या युगात महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ही बाब चिंताजनक आहे. महिलांनी आपले आरोग्य सदृढ राहण्यासाठी सकस आहार व महिन्यातून एकदातरी आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

गुरुकृपा हॉस्पिटल, सरस्वती मेडिकल फाउंडेशन, सत्यविजय जाधव मित्रपरिवारातर्फे गुरुकृपा हॉस्पिटल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व साक्षरता अभियान आयोजित केले होते. या शिबिराचे उ‌द्घाटन जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. शमिता बिरमोळे, सत्यविजय जाधव, सुधीर ठाकूर, अशोक घाडीगांवकर, विकास गुरव, प्राची परब, राजेंद्र आरेकर, सचिन कुवळेकर, वंदन तावडे, मोहीनी जाधव, राजरत्न पळसंबकर, विनायक जाधव, दत्ताराम घाडीगावकर, अखिल गुरव, अ‍ॅड. अभिजीत सावंत आदी उपस्थित होते.

श्री. पारकर म्हणाले, महिलांनी वेळेत आरोग्य तपासणी केल्यास आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार घेता येतात. शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात असून त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. कणकवली शहरात महिलांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला न. पं. कडून सहकार्य केले जाईल.

सुप्रिया मेस्त्री म्हणाल्या की, धावपळीच्या जीवनशैलीत महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि वेळेवर उपचार गरजेचे आहेत. निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब आणि सक्षम समाजाची पायाभरणी होय. महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित तपासणी करून घ्यावी आणि स्वत:च्या स्वास्थ्याची जबाबदारी स्वत: घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या शिबिरात उपस्थित महिलांची हिमोग्लोबिन, मधुमेह, कर्करोग (कॅन्सर), रक्तदाब, रजोनिवृत्ती, प्रसूती व वंध्यत्व निवारण यासंबंधी मोफत तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक सल्ला व मार्गदर्शनही देण्यात आले.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *