कणकवलीत भटक्‍या कुत्र्यांची पकड मोहीम सुरू ; नगरपंचायतीकडून एजन्सीची नियुक्‍ती : निर्बिजीकरण झाल्‍यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी सोडणार

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भटके कुत्रे पकड मोहीम आजपासून सुरू करण्यात आली. आज (ता.२७) नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

पकडलेल्‍या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे. त्‍यानंतर ज्या ठिकाणाहून हे कुत्रे आणले त्‍याच ठिकाणी ते परत आणून सोडले जाणार असल्‍याची माहिती कुत्र्यांची निर्बिजीकरण करण्याचा ठेका घेतलेल्‍या संस्थेचे अधिकारी मनोज राणे यांनी दिली.

कणकवली शहरात गेल्‍या काही महिन्यात भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढला होता. शहरातील नागरिकांना हे कुत्रे चावा घेत होते. याखेरीज दुचाकी वाहनांचा पाठलाग करून असल्‍याने दुचाकीस्वारांचे अपघात होण्याच्याही घटना वाढल्‍या होत्या. याखेरीज दुचाकीला लावलेल्‍या पिशव्यांतील साहित्‍य देखील या कुत्र्यांकडून पळवले जात होते.

कणकवली नगरपंचायतीमध्ये नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीची निवड झाल्‍यानंतर नगरपंचायतीने सर्वप्रथम भटक्‍या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा निर्णय घेतला होता. त्‍यानुसार निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती. यात असरोंडी येथील मनोज राणे यांच्या कंपनीला कुत्रे निर्बिजीकरणचा ठेका मिळाला आहे. या कंपनीकडून आजपासून शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली.

सध्या जाळ्याचा वापर करून भटकी कुत्री पकडली जात आहेत. या कुत्र्यांना पकडल्‍यानंतर त्‍यांना एजन्सीकडून प्रत्‍येक कुत्र्याला एक नंबर दिला जात असून तो नंबर कुत्र्याच्या कानावर लिहीला जात आहे. तसेच या नंबरची नोंद करून कुठल्‍या भागातून कुत्री पकडण्यात आली याची नोंद केली जात आहे.

दरम्‍यान शहरालगतच्या माळरानावर या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी तात्‍पुरते केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी या कुत्र्यांना आणून त्‍यांच्या सर्व प्रथम उपचार करून लसीकरण केले जात आहे. ही प्रक्रिया झाल्‍यानंतर ज्‍या भागातून कुत्र्यांना उचलण्यात आले, त्‍याच भागात नंतर सोडून दिले जाणार असल्‍याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाल्‍यानंतर त्‍यांच्यातील आक्रमकता कमी होणार आहे. त्‍यामुळे या कुत्र्यांच्या उपद्रवापासून नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *