धक्कादायक प्रकार ; मुख्याध्यापकाकडून १० ते १५ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

 

 

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)

 

एका तालुक्यातील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या दहा ते पंधरा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग मुख्याध्यापकाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर घटना तालुक्यातील घाटमाथ्यावरील भागात असलेल्या एका शैक्षणिक संस्थेतील माध्यमिक शाळेत घडल्याचे समोर आले आहे. पीडित विद्यार्थिनींनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित मुख्याध्यापकाने जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत तायक्वांदो प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने तसेच विविध कारणे सांगून अल्पवयीन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले.

सुरुवातीला भीती व संकोचामुळे विद्यार्थिनींनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र काही विद्यार्थिनींनी धैर्य दाखवत हा प्रकार काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आणून दिला. घटनेची माहिती समजताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याची चर्चा आहे.

यानंतर पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *