वेगुर्ले (प्रतिनिधी)
वेगुर्ले तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून वेगुर्ले पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५ वर्षे) असे आहे. ही घटना दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास अणसुर पाल मडकीलवाडी, तालुका वेगुर्ला येथे घडली. या घटनेची फिर्याद सौ. जागृती जयेश सरमळकर, मूळ राहणार अणसुर मडकीलवाडी, सध्या राहणार विनायक रेसिडेन्सी, कॅम्प वेगुर्ले यांनी दिली आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव उमेश वासुदेव सरमळकर, राहणार अणसुर मडकीलवाडी, तालुका वेंगुर्ला असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश सरमळकर याने विविध बँका व बचत गटांकडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या कारणावरून मृत आई व आरोपी मुलामध्ये वारंवार वाद व भांडणे होत होती.
घटनेच्या दिवशी मृत वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात खुर्चीवर बसलेल्या असताना आरोपी उमेश सरमळकर याने घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने अंगणात बसलेल्या आईवर गोळी झाडली. ही गोळी मृत वासंती यांच्या डाव्या बाजूच्या छातीला लागल्याने त्या जागीच गंभीर जखमी झाल्या व त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध बीएनएस कलम १०३(३) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, २७, २९ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास निसर्ग ओतारी, पोलिस निरीक्षक, वेगुर्ले पोलिस ठाणे करीत आहेत.
